IND vs ENG : ब्रायडन कार्सच्या नावावर झाली नकोशा रेकॉर्डची नोंद! त्याच्यासाठी लागले १४८ वर्षे, ३ महिने आणि २० दिवस

Brydon Carse Unwanted Record in Test : इंग्लंड क्रिकेट संघाचा नवोदित वेगवान गोलंदाज ब्रायडन कार्स सध्या भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळत आहे. केवळ ७ कसोटी सामने खेळलेल्या कार्सच्या नावावर कसोटी क्रिकेटमधील एक नकोसा विक्रम नोंदवला गेला आहे. एजबॅस्टन कसोटीच्या पहिल्या डावात फलंदाजीला उतरलेला कार्स खातेही उघडू शकला नाही. मोहम्मद सिराजने त्याला शून्यावर बाद केले. यासह, क्रिकेट इतिहासातील विकेट यादीत त्याचे नाव अशा ठिकाणी नोंदले गेले, जिथे कोणताही खेळाडू आपले नाव नोंदवू इच्छित नाही.
१४८ वर्षे, ३ महिने आणि २० दिवसांनंतर घडले असे काही
उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज ब्रायडन कार्स कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील १०,०० वा डक (शून्यावर बाद होणारा) ठरला आहे. एजबॅस्टन कसोटीच्या तिसऱ्या दिवशी हा निराशाजनक विक्रम त्याच्या नावावर नोंदला गेला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात १०,००० डक पूर्ण होण्यासाठी १४८ वर्षे, २ महिने आणि २० दिवस लागले.
इंग्लंडच्या नावावरही झाली लाजिरवाण्या विक्रमाची नोंद –
🤯🤯🤯#MohammedSiraj #ENGvsIND #brydoncarse pic.twitter.com/peRTvNt077
— Cricbuzz (@cricbuzz) July 4, 2025
भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात ब्रायडन कार्स इंग्लंडसाठी ९व्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. त्याच्यापूर्वी याच सामन्यात बेन डकेट, ऑली पोप, बेन स्टोक्स, जॉश टंग आणि शोएब बशीर यांनाही खाते उघडता आले नाही. आता कसोटी क्रिकेटमध्ये एकूण १०,००२ डक झाले आहेत. इंग्लंड हा असा पहिला संघ ठरला आहे, ज्याने एका डावात ४०० हून अधिक धावा केल्या आणि तरीही त्यांच्या ६ खेळाडूंना खाते उघडता आले नाही. १४८ वर्षांच्या कसोटी इतिहासात असे कधीच घडले नव्हते.
हेही वाचा – WI vs AUS : पॅट कमिन्सने घेतला करिश्माई कॅच, वेस्ट इंडिज अवाक्! VIDEO होतोय व्हायरल
इंग्लंडचा पहिला डाव ४०७ धावांत गारद –
एजबॅस्टन कसोटी सामन्याबद्दल बोलायचे तर, भारतीय संघ मजबूत स्थितीत आहे. पहिल्या तीन दिवसात भारताने प्रथम फलंदाजी आणि नंतर गोलंदाजीने कमाल केली. पहिल्या डावात ५८७ धावा केल्यानंतर भारताने इंग्लंडचे ५ गडी अवघ्या ८४ धावांवर बाद केले होते. त्यानंतर हॅरी ब्रूक आणि जेमी स्मिथ यांनी ३०३ धावांची भागीदारी करत इंग्लंडला संकटातून बाहेर काढले, पण सिराज-आकाशने आपल्या धारदार गोलंदाजीच्या जोरावर इंग्लंडचा पहिला डाव ४०७ धावांवर संपुष्टात आणला.
हेही वाचा – IND vs ENG : जैस्वालच्या डीआरएसमुळे खळबळ! बेन स्टोक्सने अंपायरशी घातला तुफान वाद, पाहा VIDEO
शेवटच्या दोन दिवसात पाहायला मिळणार रोमांच –
तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने १ बाद ६३ धावा केल्या होत्या. भारताकडे सध्या २४४ धावांची आघाडी आहे. केएल राहुल २८ तर करुण नायर ७ धावांवर खेळत होते. सामन्याचे दोन दिवस बाकी आहेत. चौथ्या दिवशी भारतीय संघ धावांचा पाऊस पाडून इंग्लंड मोठे लक्ष्य देण्याचा प्रयत्न करेल.





