पाचोरा : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात एका अल्पवयीन शाळकरी मुलीवर झालेल्या गंभीर अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण समाजात संतापाची लाट उसळली आहे. शाळा बस चालक असलेल्या आरोपी अबिद शेख याने मुलीवर बळजबरीने अत्याचार करून तिला धमकावले. ही घटना कोणाला सांगितली तर तुझ्या कुटुंबीयांना ठार मारेल आणि तुझे फोटो-व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करेल. या धक्कादायक प्रकरणाने महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, पिंपळगाव पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी आणि त्याच्या आईला अटक केली आहे. या घटनेच्या निषेधार्थ सकल हिंदू समाज, पाचोरा तालुका यांनी मोठा मोर्चा काढला असून, समाजजागृती आणि ‘लव्ह जिहाद’ विरोधात आवाज बुलंद केला आहे. याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, ही घटना पाचोरा तालुक्यातील एका शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीसोबत घडली. मुलीने हिम्मत दाखवत घरच्यांना सांगितल्यानंतर प्रकरण उघड झाले. पिंपळगाव पोलिस स्टेशनला तक्रार दाखल झाली असून, पोलिसांनी तातडीने अबिद शेख आणि त्याच्या आईला अटक केली आहे. आरोपीवर POCSO कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे तालुक्यातील पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.