लोणंद (प्रतिनिधी) – लोणंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आदर्की खु. ता. फलटण येथील शेताच्या बांधावरून झालेल्या भांडणातून चंद्रशेखर बबनराव निंबाळकर यांच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव घालून खून करणाऱ्या संशयित सयाजी शंकर निंबाळकर याला लोणंद पोलिसांनी अटक केली. संशयित आरोपीस दि. 8 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. याप्रकरणी लोणंद पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, दि. 2 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास आदर्की खु., ता. फलटण येथील चिंचेचा मळा शिवारात चंद्रशेखर बबनराव निंबाळकर (वय 48, रा. आदर्की खु) यांनी सयाजी शंकर निबाळकर (रा. आदर्की खु) यांच्या शेताचे बांधावरुन बोअरवेलची मशीन व पिकअप जीप नेऊन बांध खराब केल्याचा राग मनात धरुन संशयित सयाजी निंबाळकर याने चंद्रशेखर निंबाळकर यांच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव घालून गंभीर जखमी केले. या घटनेत त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले यांनी तात्काळ तपास सुरु करत संशयित आरोपीस ताब्यात घेण्यासाठी ग्रामसुरक्षा यंत्रणेचा वापर करत संशयित सयाजी शंकर निंबाळकर याचा शोध घेण्यासाठी सुचना दिली. त्यावर एका तासाच्या आत आदर्की खुर्द गावातील ग्रामस्थ व पोलीस स्टाफ यांच्या मदतीने चिंचेचा मळा शिवारातील ओढ्याजवळ सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी चैतन्य चंद्रशेखर निंबाळकर याने लोणंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधीक्षक राहुल धस यांनी भेट देत तपासाबाबत मार्गदर्शन केले. आरोपीस प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी फलटण न्यायालय हजर केले. संशयित आरोपीस दि. 8 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. पोलीस अधीक्षक समीर शेख, उपविभागीय पोलीस अधिक्षक राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सुशील भोसले, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी काटे, पोलीस अंमलदार महेश सपकाळ, नितीन भोसले, नाना भिसे, , चंद्रकात काकडे, विठ्ठल काळे, अभिजीत घनवट, बापु मदने, सतिश दडस, सिध्देश्वर वाघमोडे, सुर्यकांत सुळ,संतोष नाळे, येळे, चालक संजय चव्हाण यांनी सदरची कारवाईत सहभाग घेतला.