वसईत दिवसाढवळ्या तरुणीची निर्घृण हत्या; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया आली समोर, थेट म्हणाले….

Devendra Fadnavis | Vasai News : वसईत दिवसा-ढवळ्या एका तरुणीची निर्घृण हत्या करण्यात आली. ब्रेकअप केल्याच्या रागातून प्रियकराने तरुणीवर लोखंडी पान्याने वारंवार वार केले. या घटनेत तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे. वसई पूर्व येथील चिंचपाडा परिसरात मंगळवारी सकाळी साडे आठच्या सुमारास ही घटना घडली आहे.
मुंबईनजीकच्या शहरात अशा प्रकारची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे तरुण तिच्यावर वार करत असताना नागरिक हे दृश्य पाहूनही काहीच न घडल्यासारखे पुढे जात होते.
कोणीच आरोपीला थांबवले नाही. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, नेटकरी यावर संतप्त प्रतिक्रिया देत आहे.
मात्र, अश्यातच याप्रकरणी राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘वसईत एका तरुणीची भररस्त्यात हत्या झाल्याची घटना अत्यंत गंभीर आणि दुर्दैवी आहे. मीरा-भाईंदर पोलिस आयुक्तांना या घटनेसंदर्भात कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
वसईत एका तरुणीची भररस्त्यात हत्या झाल्याची घटना अत्यंत गंभीर आणि दुर्दैवी आहे. मीरा-भाईंदर पोलिस आयुक्तांना या घटनेसंदर्भात कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आरोपीला अटक करण्यात आली असून, सखोल तपास करुन, न्यायालयात सुद्धा भक्कम पुराव्यानिशी बाजू मांडून आरोपीला…
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 18, 2024
आरोपीला अटक करण्यात आली असून, सखोल तपास करुन, न्यायालयात सुद्धा भक्कम पुराव्यानिशी बाजू मांडून आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा होईल, यादृष्टीने निर्देशित करण्यात आले आहे. अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
काय आहे? नेमकं प्रकरण…
नालासोपारा येथे राहणारा रोहित यादव (२९) आणि आरती यादव (२२) या दोघांचे मागील सहा वर्षांपासून प्रेम संबंध होते. मात्र आरती अन्य मुलाशी बोलत असल्याचा रोहित याला संशय होता. यावरून त्या दोघांमध्ये भांडणे होत होती. त्यामुळे रोहित संतप्त झाला होता.
आरती वसईच्या एका कंपनीत कामाला लागली होती. मंगळवारी सकाळी साडेआठच्या सुमारास ती नेहमीप्रमाणे कामावर जाण्यासाठी निघाली होती. मात्र गावराई पाडा येथील स्टेट बँकेत समोर रोहितने तिला अडवले. दोघांची शाब्दिक बाचाबाची झाली.
त्यावेळी रोहित ने आपल्या सोबत आणलेल्या लोखंडी पान्याने तिच्यावर सपासप वार केले. आरती खाली कोसळली. काही वेळाने रोहित पुन्हा आला आणि त्याने तिच्यावर वार केले त्यात ती गतप्राण झाली.
हत्येनंतर आरोपी रोहित तिथेच बसून राहिला वालीव पोलिसांनी घटनास्थळावरून आरोपी रोहितला ताब्यात घेतले. मृत आरतीचे बारावीपर्यंत शिक्षण झाले असून एक महिन्यापूर्वीच ती कंपनीत कामाला लागली होती.





