वाई मतदारसंघात इच्छुकांची भाऊगर्दी

मोहित देवधर
खंडाळा – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विद्यमान आमदार मकरंद पाटील आमदारकीचा चौकार मारणार का यंदा बदल घडणार अशी चर्चा सध्या वाई- खंडाळा-महाबळेश्वर मतदारसंघात सुरु झाली आहे. मतदारसंघात इच्छुकांची भाऊगर्दी झाल्याचे दिसून येत आहे. या इच्छुकांमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांसह महायुतीतील नेत्यांचा समावेश असल्याने निवडणुकीत ऐनवेळी बंडखोरी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आगामी निवडणुकांचा विचार करता वाई- खंडाळा- महाबळेश्वर मतदारसंघातून तुतारीचा उमेदवार कोण, याची उत्सुकता संपूर्ण मतदारसंघाला लागली आहे. अनेक इच्छुकांनी आपापल्या परीने संघटन सुरू केले आहे, काहींनी गाव भेट, दौरे सुरु केले आहेत, काही जण बंडखोरीच्या तयारीत आहेत. मकरंद पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून (शरद पवार) माजी आमदार कै. मदनराव पिसाळ यांच्या कुटुंबातील सदस्याला उमेदवारी मिळणार, अशी चर्चा जोर धरू लागली आहे. यासह त्याच पक्षाचे वाई विधानसभा अध्यक्ष नितीन सावंत, औद्योगिक सेलचे माजी जिल्हाध्यक्ष दत्तात्रय उर्फ बंडू ढमाळ यांची नावेही चर्चेत आहे.
आ. मकरंद पाटील यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी मदन भोसले स्वतः किंवा कुटुंबातील व्यक्तींसाठी प्रयत्नशील असल्याची चर्चा आहे. मदन भोसले भाजपमध्ये राहून कुटुंबातील सदस्याला तुतारी हाती घ्यायला लावतील अशी शक्यता नाकारता येत नाही, सध्या काँग्रेस पक्षात असलेले विराज शिंदे यांनीही विधानसभेसाठी रणशिंग फुंकले आहे. शिवसेना शिंदे गटाकडून जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव, जिल्हा उपप्रमुख प्रदीप मानेही इच्छुक आहेत. ठाकरे गटाकडून उपजिल्हाप्रमुख अजित यादव व विधानसभा संघटक नंदकुमार घाडगे इच्छुक आहेत. मराठा क्रांती मोर्चातर्फेही उमेदवार देण्याची तयारी सुरु आहे. इच्छुकांची भाऊगर्दी झाल्याने आघाडीधर्म, युतीधर्म पाळला जाणार का उमेदवारी न मिळाल्यास बंडखोरीचा निर्णय घेणार याबाबत उत्सुकता आहे.
खंडाळा तालुक्याच्या भूमिकेकडे लक्ष
प्रत्येक नेत्याने खंडाळा तालुक्याचा फक्त राजकीय वापर करून घेतला. खंडाळा तालुक्याला आजपर्यंत मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी न मिळाल्याने खंडाळा तालुक्यातून यंदा उठाव होऊ शकतो अशी चर्चा खंडाळा तालुकावासियांमधून उमटत आहे. असे झाले व खंडाळा तालुक्याने सर्वानुमते एक उमेदवार दिला तर निश्चितपणाने यंदाची निवडणूक काटे की टक्कर होण्याची शक्यता आहे.
आयात उमेदवारीची चर्चा
यावेळच्या निवडणुकीत शरद पवार आयात उमेदवारालादेखील ऐनवेळी उमेदवारी देऊ शकतात अशी चर्चा मतदारसंघात आहे. यामध्ये विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे पुतणे व रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांचे चिरंजीव विश्वजितराजे नाईक निंबाळकर तुतारी हाती घेणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.





