शेती अन् पैशाच्या वादातून भावाला संपवलं; भयंकर घटनेने हिंगोली हादरली

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यांतर्गत दाती येथील खून प्रकरणात सख्खा भाऊच भावाचा वैरी निघाला असून त्यानेच शेती व पैशाच्या देवाण घेवाणीवरून खून केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनीच दिलेल्या फिर्यादीवरून आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही अंगावर काटा आणणारी भयंकर घटना कळमनुरी तालुक्यातील दाती या गावात घडली आहे.
नेमकं प्रकरण काय?
दाती येथे अशोक संभाजी सुर्यवंशी व रामराव संभाजी सुर्यवंशी हे दोघे सख्खे भाऊ आहेत. त्यांच्यात मागील काही वर्षापासून शेती व पैशाच्या देवाण घेवाणीवरून वाद होता. या वादातून त्यांच्यात नेहमीच कुरबुरी होत होत्या. यामध्ये सुमारे पाच वर्षापूर्वी रामराव याने अशोक यांची पत्नी शांताबाई अशोक सुर्यवंशी यांचा शेतीच्या कारणावरून खून केला होता.
दरम्यान, शनिवारी सायंकाळी सहा ते साडे सहावाजण्याच्या सुमारास अशोक हे घरात एकटे असतांना त्यांचा धारदार शस्त्राने खून झाला. अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील, उपाधिक्षक सुरेश दळवे, गुन्हे शाखेचे निरीक्षक विकास पाटील, पोलिस निरीक्षक विष्णुकांत गुठे, सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर बसवंते, उपनिरीक्षक गणेश घोटके, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक शेख बाबर यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली.
या प्रकरणात पोलिसांना मयत अशोक यांचा भाऊ रामराव याच्यावर संशय होता. त्यामुळे त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. त्यानेच शेती व पैशाच्या कारणावरून खून केला असल्याची तक्रार जमादार गौसोद्दीन हबीब यांनी आखाडा बाळापूर पोलिसात दिली. यावरून पोलिसांनी रामराव सुर्यवंशी याच्यावर खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.
प्रेम प्रकरणातून तरुणावर प्राणघातक हल्ला
माझ्या मैत्रिणीकडे का बघतोस? अशी विचारणा करत दोन मित्रांनी एका 22 वर्षीय तरुणावर प्राणघातक हल्ला केला आहे. ही घटना अकोला शहरातील जेतवननगरात घडली आहे. दोन आरोपींनी चाकूने भोसकून करण चितळे याला गंभीर स्वरूपात जखमी केले. प्रेमप्रकरणातून हा जीवघेणा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती आहे. हल्ला केल्यावर दोन्ही आरोपी फरार झाले आहे.
करण सोबत त्याचा एक मित्रही या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. त्या दोघांना ही जखमी अवस्थेत तातडीने अकोला जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हल्ला केल्यानंतर आरोपी फरार झाले. त्यांना शोधण्यासाठी पोलीसांची नाकेबंदी केली आहे.





