हर्षद कटारिया बिबवेवाडी – विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या अभूतपूर्व यशाने अनेकांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांत प्रचंड उत्साह आहे. या यशस्वी निकालानंतर निवडणूक प्रचार प्रक्रियेत थेट सहभागी नसलेल्या उत्साही कार्यकर्त्यांनीही चौका-चौकात फ्लेक्सद्वारे विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले आहे. मी बोललो होतो ना; तुम्हीच निवडून येणार.., असा आत्मविश्वास व्यक्त करीत जमेल तेवढे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करीत आहेत. निवडणुकीच्या निकालानंतर असे अनेक कार्यकर्ते नव्याने उगवले आहेत. विधानसभा निकालाबाबत सर्व राजकीय विश्लेषक, सर्वे, माध्यमे, कार्यकर्ते, पदाधिकारी इतकेच काय तर उमेदवाराला सुद्धा आत्मविश्वास नसणारे मताधिक्य मिळाले, प्रचाराच्या काळात घासून होईल यावेळी टफ आहे, अशी चर्चा करणारे आता भाऊ आणि दादा… मी बोललो होतो ना; तुम्हीच निवडून येणार.., असा विश्वास व्यक्त करणारे मतदारसंघात करमणुकीचा विषय ठरू लागले आहेत. विधानसभा निवडणुकीत प्रचार यंत्रणेत अनेक जण दूर होते तर काही उपद्रवी कार्यकर्त्यांना उमेदवारांनी नुकसान नको म्हणून कडीपत्त्यासारखे दूर ठेवले होते, अशांच्या कोणत्याही उपद्रवाला प्रतिसाद दिला गेला नाही, सदर बाब मतदार संघात चर्चेचा विषय ठरत असताना असेच कार्यकर्ते प्रचंड आत्मविश्वासाने वावरत असल्याचे चित्र आहे. अपक्ष उमेदवार किती मते घेतील याबाबत अनेकांनी पैजा लावल्या होत्या ते अंदाज फोल ठरल्याने अनेक अभ्यासू कार्यकर्त्यांनी प्रभाग, केलेली कामे, देवदर्शन ट्रिपा, शाळा, जेवनावळी अशा अनेक अंदाजामधून कोणत्या भागातून कोणत्या उमेदवाराला किती मते मिळतील याचा लेखाजोखा सादर केला होता. मात्र यावेळी निकालाच्या वेळेत मतदारांनी दिलेला काैल पाहून अनेकांचे अंदाज खोटे ठरले. अभ्यासू तज्ज्ञ ही बुचकळ्यात पडले. मात्र, उत्साही कार्यकर्त्यांचा उत्साह त्यावेळीही कमी नव्हता आणि आताही नाही. फ्लेक्सवर चमकोगिरी… निवडणुकीत प्रचारापासून दूर राहणारे कन्फ्युज कार्यकर्ते अपक्षासह सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांना मी तुमच्या सोबतच आहे, असे सांगत होते मात्र प्रचारात अंडर ग्राउंड असलेल्यांनी निकालनंतर मात्र पक्षप्रमुखांच्या फोटोसह विजय उमेदवाराबरोबर फ्लेक्स लावत, सोशल मीडियावर शुभेच्छा देण्याचा सपाटा सुरू करीत आपला अंदाज खरा ठरल्याचा गाजावाजा करीत आहेत.