मृत्यूनंतर ४० मिनिटांनी जिवंत झाली ब्रिटिश महिला; कुटुंबातील व्यक्तींना सांगितला अनुभव; काय आहे नेमकी भानगड? पाहा….

लंडन- नीअर डेथ एक्स्पीयंस अर्थात एनडीईच्या अनेक घटना जगभरात पाहायला मिळतात आणि ऐकायलाही मिळतात. समोरची व्यक्ती चकित होईल असे अविश्वसनीय दावे या प्रकारात केले जातात. आताही असाच एक दावा करण्यात आला आहे. त्यात असे म्हटले जात आहे की एक महिला तिच्या मृत्यूनंतर काही मिनिटांनी पुन्हा जिवंत झाली. ब्रिटनमधील या महिलेने मृत्यूनंतरचे आपले अनुभवही सांगितले आहेत.
उपलब्ध माहितीनुसार ब्रिटनच्या उत्तर यॉर्कशायर येथील स्कारबोरो मधील महिला क्रिस्टी बोर्टॉफ्ट ही महिला मरण पावल्यानंतर चाळीस मिनिटांनी पुन्हा जिवंत झाली. त्यानंतर तिला काय अनुभव आले याची माहिती ती देते आहे. क्रिस्टी म्हणाली की मृत्यू झाल्यावर तिला अगदी विचित्र अनुभव आला.
त्या चाळीस मिनिटांत तिने अनेक गोष्टी पाहील्या. अर्थात त्या सगळ्या तिला आठवत नाहीत. तथापि, मृत्यूनंतर तिला तिच्या त्वचेवर एक वेगळाच अनुभव आला आणि तिच्या कुटुंबातील सगळे सदस्य कमालीचे अस्वस्थ असल्याचे तिला दिसले. माझा आत्मा कुटुंबातील सदस्यांशी बोलण्याचा प्रयत्न करत होता.
माझा आत्मा मित्राच्या समोरच्या खोलीत होता आणि मी त्याला माझ्या मुलांसाठी आणि पतीसाठी एक यादी तयार करण्यास सांगण्याचा प्रयत्न करत होते. हे सगळेच अनाकलनीय होते असे तिचे म्हणणे आहे. क्रिस्टीला हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर डॉक्टरांनी तिला मृतच घोषित केले होते. पण काही मिनिटांनी ती पुन्हा सक्रिय झाली.
क्रिस्टी म्हणते की ती कोमात असताना तिचे शरीर भंगते आहे असे तिला वाटत होते आणि तिचा आत्मा तिच्या शरीरातून बाहेर पडला होता. त्यानंतर तिला अचानक एक धक्का जाणवला. त्या वेळेत माझ्या कुटुंबातील सदस्य माझ्या अंत्यसंस्काराची तयारी करत होते. तथापि, कोमातून बाहेर आल्यावर मला सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसला.





