Brijbhushan Singh : खेळाडू व रेफ्री यांचा कुस्तीपटूंच्या आरोपांना दुजोरा; ब्रिजभूषण यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हे

नवी दिल्ली – भारतीय कुस्तीगिर महासंघाचे तत्कालीन अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हे दिसत आहेत. महासंघातील एक ऑलिम्पियन खेळाडू, एक रेफ्री व एका प्रशिक्षकाने आंदोलनकर्त्या कुस्तीपटूंच्या आरोपांना दुजोरा दिला आहे. महिला कुस्तीपटूंबाबत काहीतरी भयंकर घडत होते याची आम्हाला कल्पना येत होती, अशा शब्दात या तिघांनी तपास व चौकशी समितीसमोर साक्ष दिल्याचे बोलले जात आहे.
माजी ऑलिम्पिकपटू येगेश्वर दत्त व विनेश फोगट यांचे शाब्दीक युद्ध सुरु असतानाच या रेफ्री, ऑलिम्पियन खेळाडू व प्रशिक्षकाने केलेल्या वक्तव्यामुळे ब्रिजभूषण यांच्यासमोर मोठी आडचण निर्माण झाली आहे. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणात चार राज्यांतील तब्बल 125 संभाव्य साक्षीदारांचे जबाब नोंदवले होते व त्यातच या प्रशिक्षक, रेफ्री व खेळाडूचा समावेश आहे. 28 एप्रिल रोजी दिल्ली पोलिसांनी दोन एफआयआर नोंदवले होते. त्यात लैंगिक अत्याचाराची 15 तर अयोग्य ठिकाणी स्पर्शाची 10 प्रकरणे आहेत. त्याची चौकशी व तपास सध्या एसआयटी करत आहे. ते आपला अहवाल लवकरच सर्वोच्च न्यायालयात सादर करणार आहेत. अजूनही तपास सुरू असून त्याचा आहवाल आल्यावरच सर्व सत्य समोर येईल, असा विश्वास विनेश फोगटने व्यक्त केला आहे.
लैंगिक अत्याचार झाल्यानंतर एका महिला कुस्तीपटूने घटनेच्या 6 तासांनंतरच फोनवरून माहिती दिली. दिल्ली पोलिसांनी केलेल्या चौकशीदरम्यान दोन महिला कुस्तीपटू, एक ऑलिम्पियन आणि दुसरी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील पदक विजेती या खेळाडूंनीही आंदोलनकर्त्या कुस्तीपटूंच्या दाव्याला दुजोरा दिला आहे. लैंगिक शोषण झाल्याचे अल्पवयिन कुस्तीपटू वगळता अन्य कुस्तीपटूंनी या घटनेची माहिती एका महिन्यानंतरच दिली होती.
ब्रिजभूषण यांच्या विरोधात साक्ष देणारे हे रेफ्री सध्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रख्यात आहेत. जेव्हा मी विविध स्पर्धांसाठी देशातच नव्हे तर परदेशातही खेळाडूंसह जात असे तेव्हा महिला कुस्तीपटूंची ही अवस्था मला कळायची. मात्र, त्यावेळी पुढे येऊन कोणीही तक्रार करण्याची तयारी दर्शवली नव्हती त्यामुळे त्यावेळी यावर चर्चाही झाली नाही. आता कुस्तीपटूंच्या आंदोलनामुळे हे सर्व समोर येत आहे. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यावर सगळ्यांचेच मुखवटे गळून पडणार आहेत, असेही या रेफ्रीने सांगितले आहे.
दरम्यान, आसाम कुस्ती महासंघाने भारतीय कुस्तीगीर महासंघाच्या निवडणुकीविरोधात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे गुवाहाटी उच्च न्यायालयाने या निवडणूकीला स्थगिती दिली आहे. आता सोमवारी याबाबत सुनावणी होणार असून त्यानंतरच सर्व चित्र स्पष्ट होणार आहे.
ब्रिजभूषण यांनी आरोप फेटाळले…
एफआयआर नोंदविल्यानंतर एसआयटीने ब्रिजभूषण यांची दोनवेळा चौकशी केली मात्र, प्रत्येकवेळी त्यांनी हे आरोप फेटाळले आहेत. आपण कोणत्याही गैरकृत्यात सरहभागी नसल्याचे ते आजही सांगत आहेत. मात्र, आता एसआयटी जो तपास करत आहे, त्यात रोज नवनवे चित्र समोर येत आहे.
एसआयटीने महासंघाचे सध्याचे हंगामी सचिव व तत्कालीन सचिव विनोद तोमर यांचीही चौकशी केली आहे. त्यांचेही नाव एफआयआरमध्ये सहा महिला कुस्तीपटूंनी दिले आहे. आता ही चौकशी पूर्ण झाल्यावर त्याच्या अहवालातून काय समोर येते याकडे आंदोलक कुस्तीपटूंचे लक्ष लागले असून त्यानंतरच पुढील रणनिती ठरवण्यात येणार आहे, असे विनेशने सांगितले आहे.
तब्बल दिडशे जणांचे जबाब..
एसआयटीने तब्बल 158 व्यक्तींची यादी तयार केली होती तसेच त्यांनी पुरावे गोळा करण्यासाठी हरियाणा, उत्तर प्रदेश, झारखंड आणि कर्नाटकला भेटी देत तेथेही तपास व चौकशी केली आहे. आतापर्यंत त्यांनी 125 जणांचे जबाब नोंदवले असून त्यापैकी चार महिलांनी त्यांच्या जबाबात कुस्तीपटूंच्या आरोपांना दुजोरा दिला आहे.





