Haryana Election : “ती जिथे जाईल तिथे सर्वनाश होईल…”; विनेश फोगटच्या विजयावर ब्रिजभूषण सिंह यांची पहिली प्रतिक्रिया

Brijbhushan Singh | Vinesh Phogat – जुलाना मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार आणि कुस्तीपटू विनेश फोगट सहा हजारांहून अधिक मतांनी विजयी झाल्या आहेत. त्यांनी त्यांचे जवळचे प्रतिस्पर्धी जेजेपीचे अमरजीत धांडा यांचा पराभव केला आहे.
आता भाजप नेते आणि भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांनी विनेश फोगटच्या विजयावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ब्रिजभूषण शरण सिंह म्हणाले आमचे नाव घेऊन ती (विनेश फोगट) जिंकली तर याचा अर्थ आम्ही महान लोक आहोत.
किमान माझ्या नावात इतकी ताकद आहे की, माझे नाव घेतल्याने त्यांची नाव किनाऱ्याला लागली, पण काँग्रेसला बुडू द्या. हुड्डा ( भूपिंदर हुड्डा) साहेब बुडाले, राहुलबाबांचे काय होणार? या लोकांची हरियाणाबद्दल मोठी स्वप्ने होती. त्याचे काय होणार? ती (विनेश फोगट) जिथे जाईल तिथे सर्वनाश होईल.
जुलाना जागेवर विनेश फोगट यांना एकूण ६५ हजार मते मिळाली. तर भाजपचे योगेश कुमार ५९,०६५ मते मिळाली व ते दुसऱ्या क्रमांकावर राहीले. तर इंडियन नॅशनल लोकदल पक्षाला एकूण १०,१५८ मते मिळाली.
यावेळी काँग्रेसने जुलाना जागेवर विनेश फोगट यांना तर भारतीय जनता पक्षाने कॅप्टन योगेश यांना उमेदवारी दिली होती. त्याचवेळी आम आदमी पक्षाने कुस्तीपटू कविता दुग्गल यांना तिकीट देऊन स्पर्धा रंजक करण्याचा प्रयत्न केला होता. ब्रिज भूषण यांच्यावर विनेश फोगटसह अनेक कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचे आरोप केले होते.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी ब्रिजभूषण यांच्याविरोधात दोन एफआयआर नोंदवले होते. ब्रिजूभूषण यांच्या विरोधात झालेल्या निदर्शनांत साक्षी मलिक, विनेश फोगट, बजरंग पुनिया असे अनेक मोठे कुस्तीपटू सहभागी झाले होते.





