कुस्ती संघटनेच्या निवडणुकीतून ब्रिजभूषण शरण सिंह बाहेर

नवी दिल्ली – देशातील अव्वल महिला कुस्तीपटूनी लैंगिक शोषणाचे आरोप केल्यानंतर वादात अडकलेले ब्रिजभूषण शरण सिंह भारतीय कुस्तीगिर संघटनेची निवडणूक लढवणार नसल्याचे समोर आले आहे. ही निवडणूक येत्या सात मे रोजी होणार आहे. मात्र, संघटनेमध्ये नवीन भूमिका स्वीकारणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.
अचानक बोलवण्यात आलेल्या सर्वसाधारण परिषद व कार्यकारिणी बैठकीनंतर तो माध्यमांशी बोलत होते. सरचिटणीस व्ही. एन. प्रसूद यांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीत भारतीय कुस्ती संघटनेच्या निवडणुकीची रचना ठरवण्यात आली. ब्रिजभूषण यांनी अध्यक्षपदाच्या चार वर्षांच्या तीन टर्म पूर्ण केल्या आहेत. त्यांची 12 वर्षे कार्यकाळाचीही पूर्तता झाली आहे.
आता त्यांना चार वर्षांच्या कुलिंग ऑफ कालावधी पूर्ण करावा लागणार आहे. आता त्यांचे वय 66 असून चार वर्षांनी ते 70 वर्षांचे होतील. दरम्यान आपण कोणत्याही महिला खेळाडूचे लैंगिक शोषण केलेले नाही. माझ्यावरील आरोप चुकीचे आहेत. जर या आरोपात तथ्य असते तर देशाची ऑल्मिपिकपटू महिला कुस्तीपटू साक्षी मलिकने मला तिच्या विवाहाला आमंत्रित केले असते का, असा सवालही ब्रिजभूषण यांनी माध्यमांशी बोलताना केला.





