Pune Gramin : पाटबंधारे विभागाच्या खोलीचे कुलूप तोडून पुलाच्या बांधकामाचे साहित्य लांबविले; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

शिरूर : शिरूर तालुक्यातील कवठे येमाई गावाच्या हद्दीत घडलेल्या चोरीच्या घटनेने खळबळ उडाली आहे. पाटबंधारे विभागाच्या बंद खोलीचे आणि पत्र्याच्या शेडचे कुलूप तोडून पुलाच्या कामासाठी लागणारे साहित्य चोरून नेल्याची घटना घडली आहे. या घटनेत तब्बल २ लाख ५२ हजार ५४५ रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
ही घटना २५ एप्रिल रोजी रात्री साडे दहा वाजता ते २६ एप्रिलच्या पहाटे ३ वाजेच्या दरम्यान कवठे येमाई गावाजवळील घोड नदीकाठावर घडली आहे. याप्रकरणाची अजित बाळू येवले (वय २५, व्यवसायाने स्ट्रक्चर इंजिनिअर, रा. रेनवडी, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून शिरूर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, २५ एप्रिल रोजी रात्री साडेदहा वाजता ते २६ एप्रिलच्या पहाटे ३ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने पाटबंधारे विभागाच्या बंद खोलीचे आणि पत्र्याच्या शेडचे कुलूप तोडले आणि आतमध्ये प्रवेश केला. त्यानंतर तब्बल २ लाख ५२ हजार ५४५ रुपये किंमतीचे पुलाच्या कामासाठी लागणारे साहित्य चोरटयांनी चोरून नेले पळवले. चोरीस गेलेले साहित्य रस्त्याच्या पुलाच्या कामासाठी अत्यंत महत्वाचे होते.
या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या देखरेखीखाली अधिक वेगाने सुरू करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत असून चोरट्यांचा लवकरच छडा लावण्यात येईल, असा विश्वास पोलीस प्रशासनाने व्यक्त केला आहे.





