BRICS Dinner : रशियाचे पुतिन- चीनचे जिनपिंगसह ब्रिक्स नेत्यांना शाकाहारी जेवणाची खास सोय; भाकर, तुरीची दाळ अन्…. पाहा मेन्यू
BRICS Dinner :

BRICS Dinner : ब्रिक्स शिखर परिषदेदरम्यान भारताने पाहुणचाराची खास झलक दाखवली. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासह BRICS देशांच्या नेत्यांसाठी खास शाकाहारी मेन्यू तयार करण्यात आला. या मेन्यूमधून भारतातील विविध राज्यांच्या खाद्यसंस्कृतीची ओळख करून देण्यात आली.
डिनरची सुरुवात गुजरातच्या प्रसिद्ध खांडवीने झाली. त्यासोबत मशरूम गलौटी कबाब देण्यात आला. मुख्य जेवणात पनीर लबाबदार आणि हिमालयीन भागातील दुर्मिळ गुच्छी मशरूमचा समावेश होता.
दक्षिण भारताच्या खाद्यपरंपरेची झलकही या मेन्यूमध्ये पाहायला मिळाली. गाजर-बीन्स पोरियल आणि टोमॅटो-बेल्ले सारू हे पदार्थ पाहुण्यांना देण्यात आले. यासोबत तुरीची दाळ, भारतीय पद्धतीच्या विविध भाकरी आणि पोळींचाही समावेश होता.
मिलेट पुलावातून भारताच्या ‘श्री अन्न’ परंपरेचे दर्शन घडले. बासमती तांदूळ आणि बाजरीचा वापर करून हा पुलाव तयार करण्यात आला. त्यासोबत बीट रायता देण्यात आला.
जेवणाच्या शेवटी जुन्या दिल्लीच्या खाद्यसंस्कृतीची झलक मिठाईतून दाखवण्यात आली. ओल्ड दिल्ली फ्रूट क्रीम-जलेबी आणि शहतूत फिरनी पाहुण्यांना देण्यात आली. शहतूत फिरनीला सोन्याच्या पानाने सजवण्यात आले होते.
या खास मेन्यूमधून भारताने केवळ पाहुणचार केला नाही, तर देशातील विविध प्रांतांची खाद्यपरंपरा आणि सांस्कृतिक विविधताही जागतिक नेत्यांसमोर मांडली, अशी सरकारची भावना आहे. त्यामुळे BRICS परिषदेतील चर्चांसोबत भारताची ‘डिनर डिप्लोमेसी’ म्हणून हाही विषय चर्चेचा ठरला.





