BRICS Business Forum : ‘ग्लोबल सोल्यूशन हब’ म्हणून भारताची नवी ओळख; मोदी म्हणाले, ब्रिक्सची अर्थव्यवस्था 4.5 पटीने वाढली
BRICS Business Forum : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिक्स देशांची संयुक्त जीडीपी ४.५ पटीने वाढल्याचे सांगितले. भारत जागतिक उपायांचे केंद्र बनत असल्याचेही त्यांनी म्हटले.

BRICS Business Forum : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी भारत मंडपम येथे आयोजित ब्रिक्स बिझनेस फोरमला संबोधित केले. यावेळी त्यांनी ब्रिक्स देशांच्या वाढत्या आर्थिक ताकदीवर प्रकाश टाकला. गेल्या काही वर्षांत ब्रिक्स देशांची संयुक्त जीडीपी सुमारे ४.५ पटीने वाढली असून, जागतिक अर्थव्यवस्थेच्या तुलनेत ही वाढ जवळपास दुप्पट वेगाने झाल्याचे मोदी यांनी सांगितले.
२१ देशांचा ब्रिक्स परिवार –
मोदी म्हणाले की, २००६ मध्ये ब्रिक्सची सुरुवात केवळ चार देशांपासून झाली. आता ब्रिक्स आणि ब्रिक्स भागीदार मिळून २१ देशांचा समूह झाला आहे. हे देश जगातील सुमारे ५० टक्के लोकसंख्या, ४० टक्के जीडीपी आणि २५ टक्क्यांहून अधिक व्यापाराचे प्रतिनिधित्व करतात.
गेल्या काळात जागतिक जीडीपी सुमारे १.५ पटीने वाढली. त्याच काळात ब्रिक्स देशांची संयुक्त जीडीपी सुमारे ४.५ पटीने वाढली आहे. ब्रिक्स देश आता जागतिक नवकल्पना आणि विविध समस्यांवरील उपायांचे महत्त्वाचे केंद्र बनत असल्याचेही मोदी यांनी सांगितले.
भारताच्या ब्रिक्स अध्यक्षपदाची यंदाची संकल्पना ‘लवचिकता, नवकल्पना, सहकार्य आणि शाश्वतता’ यावर आधारित आहे. ऊर्जा आणि तंत्रज्ञानासह विविध क्षेत्रांतील पुरवठा साखळी अधिक मजबूत आणि विश्वासार्ह करण्यावर भारताने भर दिला आहे. त्यामुळे जागतिक अनिश्चिततेच्या काळातही भारत विकास आणि स्थैर्याचा विश्वास देत असल्याचे मोदी म्हणाले.
४० देशांसोबत मुक्त व्यापार करार –
जगभरात व्यापारातील अडथळे वाढत असताना भारत आर्थिक संबंधांचे पूल उभारत आहे, असे मोदी यांनी सांगितले. २०१४ नंतर भारताने जवळपास ४० देशांसोबत मुक्त व्यापार करार केले आहेत.
ब्रिक्सच्या माध्यमातूनही व्यापारातील अडथळे कमी करून व्यवसायाच्या संधी वाढवण्यावर भारताचा भर आहे. यासाठी कृषी, आरोग्य, कौशल्य विकास आणि स्मार्ट ग्रीड यांसारख्या क्षेत्रांत नव्या सहकार्याच्या संधी निर्माण करण्यात आल्याचे मोदी यांनी सांगितले.





