Bribe News: राजगुरुनगर नगरपरिषदेच्या महिला अभियंत्याला ठेकेदाराकडून 8 हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी अटक

राजगुरूनगर – ठेकेदाराकडून 8 हजार रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी राजगुरूनगर नगरपरिषदेचे आरोग्य विभागाच्या अभियंता चारुबाला हरडे, लेखापाल प्रवीण कापसे यांना लाच लुचपत विभागाच्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर त्यांना प्रोत्सहान दिल्याप्रकरणी मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे यांच्याविरोधात खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची माहिती अशी की, तक्रारदार हे सरकारी ठेकेदार असून त्यांना राजगुरूनगरपरिषद येथील आरोग्य विभाग या करिता लागणारे साहित्य पुरवले होते. त्याचे एकूण 80 हजार 730 रुपयांचे बिल त्यांनी राजगुरूनगर नगरपरिषद येथे सादर केले होते. नमूद बिल काढून देण्याकरिता लोकसेवक चारुबाला हरडे यांनी आठ हजार रुपये लाचेची मागणी केली होती.
तक्रारदार यांनी याबाबत लाच लुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार मागील दोन दिवस लाच लुचपत विभागाचे पोलीस अधिकारी तपास करून खात्री करीत होते. बुधवारी (दि. 13) दुपारी लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून 8 हजार रुपयांची पंचासमोर लोकसेवक चारूबाला हरडे यांना राजगुरू नगरपरिषद कार्यालयामध्ये लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडून अटक केली. लोकसेवक लेखापाल प्रवीण कापसे आणि लोकसेवक मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे यांनी लोकसेवक हरडे यांना लाच स्विकरण्याकरिता प्रोत्साहन दिल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण निंबाळकर, निरीक्षक रुपेश जाधव, महिला पोलीस शिल्पा तुपे, आशिष डावकर, माळी यांनी ही कारवाई केली.




