Pimpri: कर्तव्य बजावतानाच थांबले श्वास; अमली पदार्थ तस्कराचा पाठलाग करताना निष्ठावंत पोलिसाचा हृदयविकाराने मृत्यू
सहकाऱ्यांना, वरिष्ठांना आणि उपस्थित प्रत्येक नागरिकाला अश्रू अनावर

पिंपरी – शहराला ड्रग्जच्या विळख्यातून वाचवण्यासाठी खाकी वर्दीतील एका कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्याने स्वतःचा जीव पणाला लावला; मात्र, गुन्हेगाराच्या मुसक्या आवळण्यासाठी जिवाच्या आकांताने धावणाऱ्या त्या पावलांना नियतीने अर्ध्यावरच खिळवून ठेवले.
अमली पदार्थ विरोधी पथकातील हवालदार जावेद बागसिराज (वय ३८) यांचे रविवारी (दि. २५ ऑक्टोबर) रात्री कर्तव्य बजावत असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. शहरातील तरुणाईला उद्ध्वस्त करणाऱ्या ‘एमडी’ ड्रग्जची विक्री करण्यासाठी दोघेजण संत तुकाराम नगर येथील आंतरिक सोसायटीजवळ येणार असल्याची माहिती जावेद यांना मिळाली होती.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सहकाऱ्यांसह त्या भागात सापळा रचला. ठरल्याप्रमाणे संशयित आरोपी येताच पोलिसांनी झडप घालून एकाच्या मुसक्या आवळल्या. परंतु, साथीदार पकडला गेल्याचे पाहताच दुसरा आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पळू लागला.
तो हातातून निसटू नये म्हणून जावेद यांनी त्याच्या मागे धाव घेतली. चोराला पकडण्यासाठी धावत असतानाच अचानक त्यांच्या छातीत असह्य कळ आली. पायातले त्राण संपले आणि ते जमिनीवर कोसळले. सहकाऱ्यांनी क्षणाचाही विलंब न लावता त्यांना पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात दाखल केले; डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली, मात्र उपचारादरम्यान आलेल्या दुसऱ्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली.
कर्तव्यदक्ष खाकीचा प्रामाणिक प्रवास
जावेद यांचे कुटुंब मूळचे कर्नाटकातील, मात्र त्यांचे वडील पुण्यात स्थायिक झाले आणि जावेद यांचा जन्म पुण्यातच झाला. अत्यंत सामान्य कुटुंबातून स्वकर्तृत्वावर ते २०१० मध्ये पुणे पोलीस दलात दाखल झाले होते.
हडपसर, मुंढवा आणि २०१८ मध्ये पिंपरी-चिंचवड आयुक्तालय सुरू झाल्यानंतर त्यांनी पिंपरी पोलीस ठाणे व गुन्हे शाखेत धडक कामगिरी केली. अत्यंत शांत, संयमी आणि कामावर अतोनात प्रेम करणारा सहकारी अशी त्यांची ओळख होती.
मुलांच्या डोक्यावरून मायेचे छत्र हरपले
जावेद यांच्या निधनाने १२ वर्षांची मुलगी आणि अवघ्या ७ वर्षांच्या मुलाच्या डोक्यावरील पित्याचे छत्र हिरावले गेले आहे. ज्या वयात वडिलांचे बोट धरून जगाशी मुकाबला करायचा, त्याच वयात त्या निष्पाप डोळ्यांसमोर वडिलांचा निष्प्राण देह पाहण्याची दुर्दैवी वेळ या चिमुरड्यांवर आली. कसबा येथील कब्रस्तानात सोमवारी दुपारी शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
सहकाऱ्यांना, वरिष्ठांना आणि उपस्थित प्रत्येक नागरिकाला अश्रू अनावर झाले होते. कर्तव्य बजावताना स्वतःच्या प्राणांची आहुती देणाऱ्या या वर्दीतील वीरपुत्राला संपूर्ण शहराने जड अंतःकरणाने अखेरचा निरोप दिला.
Ravikant Tupkar: नैसर्गिक आपत्तीला फक्त शेतकऱ्यांनी सामोरे जायचे का? – रविकांत तुपकर





