Crime : रांजणगाव गणपती – सोशल मीडियावर झळकलेल्या एका फोटोमुळे आईने स्वतःच्या ११ महिन्यांच्या चिमुकल्याचा खून केल्याची धक्कादायक घटना शिरूर तालुक्यात उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पूजा रवींद्र पवार (वय २२) हिला अटक केली असून, परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भांबर्डे (ता. शिरूर) येथील रहिवासी रवींद्र अशोक पवार यांनी ८ मार्च २०२६ रोजी पत्नी पूजा आणि ११ महिन्यांचा मुलगा यश बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. सुरुवातीला या प्रकरणाची आकस्मित मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली होती. पूजा ही मूळची अहिल्यानगर जिल्ह्यातील असून तिचे हे दुसरे लग्न होते. रवींद्र पवार यांचेदेखील हे दुसरेच लग्न होते. दरम्यान, ५ मार्च रोजी दोघे मुरुड येथे फिरायला गेले होते. त्यानंतर ८ मार्चला पूजा मुलगा यशला घेऊन घरातून निघून गेली. काही दिवसांनी रवींद्र पवार यांच्या नजरेस सोशल मीडियावर पूजाचा दुसऱ्या व्यक्तीसोबत लग्नाचा फोटो पडला. यामुळे संशय वाढल्याने त्यांनी पूजाशी संपर्क साधून मुलाबाबत विचारणा केली; मात्र तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी पूजाची कसून चौकशी केली असता सुरुवातीला तिने मुलगा ओट्यावरून पडून मृत्यू झाल्याचे सांगितले. मात्र सखोल तपासात धक्कादायक सत्य समोर आले. मुलगा सतत रडत असल्याने आणि भविष्यात पुन्हा लग्न करताना अडथळा ठरू नये या विकृत विचारातून पूजाने मुलाचे डोके घरासमोरील सिमेंटच्या ओट्यावर आपटून त्याचा खून केल्याची कबुली दिली. यानंतर तिने मृतदेह पिशवीत भरून शेतातील विहिरीत टाकला. पिशवी पाण्यात बुडून राहावी यासाठी त्यात दगडही ठेवण्यात आले होते. घटनेनंतर पूजा परिसरातच थांबली. पुढच्या दिवशी दागिने विकून काही दिवसांनी पारनेर तालुक्यातील एका युवकासोबत तिने लग्न केले. इन्स्टाग्रामवरील फोटोमुळे हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी वेगाने तपास करत आरोपीला अटक केली. हा तपास संदीप सिंह गिल (पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण) यांच्या मार्गदर्शनाखाली रमेश चोपडे (अप्पर पोलीस अधीक्षक), प्रशांत ढोले (पोलीस उपविभागीय अधिकारी), महादेव वाघमोडे (पोलीस निरीक्षक), तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक चव्हाण आणि त्यांच्या पथकाने केला. या घटनेमुळे ‘आई’ या नात्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून परिसरात संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान, आरोपी महिलेने २०२० मध्ये पहिले, २०२४ मध्ये दुसरे आणि २०२६ मध्ये तिसरे लग्न केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.