Pregnancy Care: गरोदरपणात आणि बाळंतपणानंतरचा रक्तक्षय; आईसाठी धोक्याची घंटा!
Pregnancy Care रक्तक्षय म्हणजे शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होणे. हिमोग्लोबिन ऑक्सिजन शरीरभर पोहोचवते. ते कमी झाल्यास थकवा, गरगरणे, धाप लागणे, पांढरट त्वचा, डोकेदुखी अशी लक्षणे दिसतात.

Pregnancy Care: गरोदरपणात महिलांच्या शरीराला जास्त रक्ताची गरज असते. त्यामुळे सौम्य रक्तक्षय (अॅनिमिया) सामान्य मानला जातो. मात्र हिमोग्लोबिन खूप कमी झाले, तर आई आणि बाळ दोघांच्याही आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. प्रसूतीनंतरही अनेक महिलांना रक्तक्षयाचा त्रास होतो, कारण त्या बाळाच्या काळजीत स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करतात.
रक्तक्षय म्हणजे शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होणे. हिमोग्लोबिन ऑक्सिजन शरीरभर पोहोचवते. ते कमी झाल्यास थकवा, गरगरणे, धाप लागणे, पांढरट त्वचा, डोकेदुखी अशी लक्षणे दिसतात.
रक्तक्षयाच्या चार पायऱ्या असतात. सुरुवातीला शरीरातील लोहसाठा कमी होतो. पुढे लाल रक्तपेशी कमी तयार होतात. तिसऱ्या टप्प्यात हिमोग्लोबिन घटते. चौथ्या टप्प्यात गंभीर लक्षणे जाणवतात.

Anaemia in Pregnancy
रक्तक्षयाचे मुख्य प्रकार म्हणजे
1. लोहाच्या कमतरतेमुळे होणारा रक्तक्षय – सर्वाधिक आढळणारा प्रकार.
2. फोलेटच्या कमतरतेमुळे रक्तक्षय – बाळाच्या विकासावर परिणाम होऊ शकतो.
3. जीवनसत्व B-12 च्या कमतरतेमुळे रक्तक्षय – विशेषतः शाकाहारी महिलांमध्ये दिसतो.
कारणे कोणती?
आहारात लोह, फोलिक ऍसिड कमी असणे, प्रसूतीदरम्यान जास्त रक्तस्त्राव, जुळी गर्भधारणा, वारंवार गरोदरपण, पचनसंस्थेचे आजार, मलेरिया किंवा इतर संसर्ग ही काही प्रमुख कारणे आहेत.

Anemia In Pregnancy
उपाय काय?
- आहारात चिकन, मटण, मासे, अंडी, डाळी, कडधान्ये, हिरव्या पालेभाज्या यांचा समावेश करावा.
- लिंबूवर्गीय फळे, टोमॅटो, किवी यांसारखे जीवनसत्व C युक्त पदार्थ घ्यावेत.
- चहा कमी घ्यावा, कारण तो लोहाचे शोषण कमी करतो.
- भरपूर पाणी प्यावे.
- डॉक्टरांच्या सल्ल्याने लोह, फोलिक ऍसिड आणि B-12 सप्लिमेंट घ्याव्यात.
- पुरेशी विश्रांती घ्यावी.
गरोदरपणात आणि प्रसूतीनंतर आईने स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. योग्य आहार, नियमित तपासणी आणि डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास रक्तक्षय टाळता येऊ शकतो.





