Breaking News : जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी सुनिल केदार दोषी; तब्बल 22 वर्षांनंतर निकाल

Sunil Kedar – नागपूर जिल्हा बँके घोटाळा प्रकरणी अखेर काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री सुनील केदार (Sunil Kedar) यांना दोषी निश्िचत करण्यात आले आहे. या प्रकरणाचा तब्बल 22 वर्षांनंतर निकाल लावण्यात आला असून या प्रकरणात सुनील केदार यांच्या व्यतिरिक्त आणखी सहा जण हे दोषी ठरविण्यात आले आहेत.
अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी ज्योती पेखले-पूरकर यांनी आज हा निकाल दिला आहे. ज्यावेळी नागपूर जिल्हा बँकेमध्ये 2002 या साली हा घोटाळा झाला होता, तेव्हा सुनील केदार या बँकेच्या अध्यक्षपदी होते. या बँकेत एकूण 150 कोटींपेक्षा अधिक रुपयांचा घोटाळा उघडकीस आला होता.
नागपूर जिल्हा बँकेचा घोटाळा उघडकीस आल्यानंतर यातील 11 पैकी 9 आरोपींविरोधात भादंविच्या कलम 406 (विश्वासघात), 409 (शासकीय नोकर आदींद्वारे विश्वासघात), 468 (बनावट दस्तऐवज तयार करणे), 471 (बनावट दस्तऐवज खरे भासविणे), 120-ब (कट रचणे) व 34 (समान उद्देश) हे दोषारोप निश्चित करून हा खटला चालविण्यात आला.
या प्रकरणात काँग्रेस नेते-आमदार सुनील केदार, बँकेचे तत्कालीन महाव्यवस्थापक अशोक नामदेव चौधरी, रोखे दलाल केतन कांतीलाल सेठ, सुबोध चंदादयाल भंडारी, नंदकिशोर शंकरलाल त्रिवेदी (सर्व मुंबई), अमित सीतापती वर्मा (अहमदाबाद) यांचा समावेश असल्याचे उघड झाले.
तर या प्रकरणातील 9 आरोपींपैकी 3 जणांना निर्दोष जाहीर करण्यात आले आहे. सध्या कोर्टात शिक्षेच्या प्रमाणावर युक्तिवाद सुरु आहे. सहा दोषींचे वकील युक्तिवाद करत आहेत.





