Breaking News : शरद पवारांची कार्यकर्त्यांसमोर मोठी घोषणा; म्हणाले, “दोन दिवसांनंतर….’

मुंबई – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर संपूर्ण राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या आत्मचरित्राच्या दुसऱ्या भागाचे प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता. हा सोहळा यशवंराव चव्हाण सेंटर येथे पार पडला आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने शरद पवारांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना त्यांनी आपल्या निवृत्तीची घोषणा केली आहे.
शरद पवार यांच्या निर्णयानंतर अनेक मंत्री आणि कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केल्या आहे. तसेच, शरद पवार यांनी आपला निर्णय मागे घ्यावा, अशी भावना सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने देण्यात येत आहे. पक्षाचे पदाधिकारी आणि नेतेमंडळी यांच्याकडून पवार यांची मनधरणी सुरू असून आता पवार यावर काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागून आहे.
मात्र, पवार आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे दिसतेय. अशातच राजकीय घडामोडींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. शरद पवार यांनी वाय बी सेंटर बाहेर आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला आहे. यावेळी शरद पवार म्हणाले, “गेले दोन दिवस पक्षाच्या सगळ्या सहकाऱ्यांसोबत तुम्हीही तुमच्या तीव्र भावना व्यक्त करत आहात. कालदेखील आमची यासंबंधी चर्चा झाली आहे. तुम्ही सर्वजण महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यातून आला आहात. तुम्ही फार आग्रही दिसत आहात.
#WATCH | Mumbai: Sharad Pawar meets NCP workers amid protest by them after resignation announcement by Pawar as party chief. pic.twitter.com/m9amIsITHv
— ANI (@ANI) May 4, 2023
पण राजीनामा देण्याआधी मी तुमच्याशी चर्चा केली असती, तर मला खात्री होती की तुम्ही मला होय म्हणाले नसता. हा जो निर्णय घेतला आहे, त्यावर राज्याबाहेरील लोकांबरोबर उद्या बैठक होईल. त्यानंतर एक ते दोन दिवसांत अंतिम निर्णय सांगू. दोन दिवसानंतर तुम्हाला असं बसावं लागणार नाही.’ असं शरद पवार यावेळी म्हणाले.
तसेच ते पुढे म्हणाले की, ‘पण मी जो निर्णय घेतला आहे, तो पक्षाच्या भवितव्यासाठी घेतला आहे. आम्ही भक्कमपणे मागे आहोत तोवर एक शक्तिशाली नेतृत्व उभं करावं असा त्यामागचा हेतू होता. पण असा निर्णय घेताना चर्चा करण्याची गरज असते हे खरं आहे. पण जर मी तुम्हा लोकांशी चर्चा केली असती तर तुम्ही हो म्हटलं नसतं याची मला खात्री होती’. असं देखील शरद पवारांनी यावेळी स्पष्ट सांगितलं.





