मुंबई – बॉलिवूड अभिनेता संजय दत्त सध्या दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत जास्त सक्रिय आहे. ‘KGF Chapter 2’ मध्ये ‘Adheera’ बनून त्याने प्रेक्षकांची मने जिंकली, त्यानंतर आता तो तमिळमधील ‘Thalapathy 67’ आणि कन्नडमधील ‘KD the Devil’ मध्ये दिसणार आहे. काही दिवसांपूसर्वीच ‘केडी द डेव्हिल’ या कन्नड चित्रपटाचा हिंदीत टीझर प्रदर्शित झाला आहे. सोशल मीडियावर देखील सिनेरसिकांना या टीझरला जोरदार प्रतिसाद दिल्याचं दिसून आलं.
दरम्यान, आता याच चित्रपटाबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. ‘केडी द डेव्हिल’ या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारणारा सर्वांचा लाडका संजू बाबा शूटिंगदरम्यान जखमी झाला आहे. बेंगळुरूच्या जवळच्या भागात या चित्रपटाचे शूटिंग सुरु होते. या चित्रपटासाठी फाईट कम्पोज करत असताना बॉम्बस्फोटाचे शूटिंग सुरु होते. या दरम्यान मोठा स्फोट झाला आणि संजू बाबा जखमी झाला.
मिळालेल्या माहितीनुसार यावेळी संजयच्या कोपर, हात आणि चेहऱ्यावर खूप जखमा झाल्या आहेत. या घटनेनंतर चित्रपटाचे शूटिंग थांबवण्यात आले आहे. ही बातमी समोर आल्यानंतर संजय दत्तचे चाहते चांगलेच चिंतेत पडले आहेत. मात्र, अद्याप अभिनेत्याच्या प्रकृती बाबत कोणतीही सविस्तर माहिती समोर आलेली नाही.