मुंबई – कसबा आणि चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपने उमेदवार जाहीर केल्यानंतर राजकीय घडामोडींना मोठा वेग आला आहे. भाजपने कसब्यातून टिळक कुटुंबियांना उमेदवारी न देता हेमंत रासने यांच्या नावाची घोषणा केली. त्यानंतर काँग्रेसने देखील रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देत मैदानात उतरवले. आज काँग्रेस कार्यकर्त्यांसह धंगेकर आपल्या उमेदवारीचा फॉर्म भरणार आहेत. मात्र, असं असलं तरी कसब्याच्या निवडणुकीत आता नवा ट्विस्ट आला आहे. ठाकरे गटाचे मित्र पक्ष असलेल्या संभाजी ब्रिगेडने ही निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. संभाजी ब्रिगेडची ठाकरे गटासोबत युती आहे. संभाजी ब्रिगेडही कसबा विधानसभा पोटनिवडणूक लढवणार असून, संभाजी ब्रिगेडचे अविनाश मोहिते यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मोहिते आज उमेदवारी अर्ज भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता कसब्याची निवडणूक चौरंगी होण्याची शक्यता आहे. कसबा विधानसभा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागांवर ही पोटनिवडणूक होणार आहे. दरम्यान, ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, असा भाजपाचा प्रयत्न होता. मात्र, महाविकास आघाडीने देखील ही निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली असून रवींद्र धंगेकर यांना मैदानात उतरवले आहे. तर आता दुसरीकडे संभाजी ब्रिगेडचे अविनाश मोहिते देखील आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत.