Breaking news : निकालापूर्वीच राज्यातील दोन बड्या नेत्यांची भेट; हालचालींना आणखी वेग….

Raj Thackeray : मागील दीड वर्षे चाललेला राज्यातील सत्तासंघर्षाचा घोळ अखेर आज संपण्याची चिन्हे आहेत. शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र ठरवायचे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांना? याचा फैसला विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आज करणार आहेत.
मात्र निकाल नेमका किती वाजता लागणार याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नसल्याने ठाकरे गटाचे वकील असीम सरोदे यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. तर, दुसरीकडे अंतिम निकाल साधारण दुपारी चार वाजता देणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे शिंदे गटाच्या 16 तर ठाकरे गटाच्या 14 आमदारांवर टांगती तलवार असल्याचं दिसून येत आहे.
दरम्यान, आजच्या या निकालापूर्वीच राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थान आज सकाळी केसरकर यांनी ही भेट घेतली. राज ठाकरे आणि दीपक केसरकर यांच्यामध्ये झालेल्या या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली आहे.
राज ठाकरे यांच्यासोबत नेमकी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली, यावर दीपक केसरकर यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ‘राज साहेब एक वेगळा व्यक्तिमत्व आहे. ज्या रमाकांत आचरेकरांनी सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी यासारखे असंख्य क्रिकेटर घडवले त्यांची एक छोटीशी आठवण शिवाजी पार्क मैदानावर असावी.
या ठिकाणी अनेक लहान लहान मुले क्रिकेट खेळायला येतात आणि त्यातूनच क्रिकेटर घडवला जातो. लवकरच पालकमंत्री म्हणून मिटिंग घेऊन त्याला मान्यता देईल आणि मैदानावर अतिक्रमण होऊ देणार नाही, असं राज ठाकरेंना सांगितलं असल्याचं दीपक केसरकर यावेळी म्हणाले. केसरकर आणि राज ठाकरे यांची वीस दिवसांपूर्वीच ठरली बैठक ठरली होती. मात्र, या बैठकीत मदार अपात्रतेच्या मुद्द्यावरही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.





