Breaking News : ‘गॅस सिलिंडरप्रमाणे दर महिन्याला विजेचे दरही बदलणार’; सरकारकडून तयारी सुरू

Uttar Pradesh – आतापर्यंत आपण पेट्रोल आणि डिझेलच्या दरात उतार चढाव पाहत आलो आहे. दर महिन्याला गॅस सिलिंडरच्या दरातही बदल होतात. मात्र आता विजेच्या दराबाबतही असेच काहीसे होणार आहे. उत्तर प्रदेशात आता दर वर्षाला नाही तर दर महिन्याला विजेचे दर कमी किंवा जास्त होणार आहेत.
उत्तर प्रदेश विद्युत नियामक आयोग वीज कंपन्यांना दर महिन्याला स्वत: असे दर निश्चितेचे अधिकार देण्याबाबत विचार करतो आहे. त्याकरता सध्याच्या नियमांमध्ये दुरूस्ती करण्याच्या अनुशंगाने १९ तारखेला बैठक बोलावण्यात आली आहे.
उत्तर प्रदेशात सध्या दर तीन महिन्यांनी इंधन अधिभार निश्चित करण्याची व्यवस्था आहे तथापि, हा निर्णय ग्राहकांना लागू करण्यासाठी वीज कंपन्यांना अगोदर विद्युत नियामक आयोगाची परवानगी घ्यावी लागते.
इंधन अधिभाराशी संबंधित हे प्रस्ताव बरेच दिवस आयोगाकडे अडकून पडतात. केंद्र सरकारने आता तीन महिन्यांऐवजी प्रत्येक महिना हिशेबाने इंधन अधिभार ग्राहकांना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच आधारावर आता नियामक आयोग आपल्या नियमांत बदल करणार आहे.
दरम्यान, ग्राहक परिषदेचे अध्यक्ष अवधेश प्रसाद वर्मा यांनी याला आक्षेप घेतला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार जर हा कायदा केला गेला तर वीज कंपन्या मनमानी पध्दतीने दर आकारतील आणि ते ग्राहकांवर लादले जातील.
वीज कंपन्यांचा इतिहास पाहता त्यांनी ग्राहकांवर बोजा टाकण्याचेच काम केले आहे. त्यामुळे दरवाढ होत राहण्याचीच शक्यता अधिक आहे व दर कमी होणार नाहीत असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळेच ग्राहक परिषद हा कायदा लागू होऊ देणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे.
गॅस सिलिंडरचे नवे दर काय?
1 सप्टेंबरपासून 19 किलो वजनाचा LPG सिलिंड कोलकाता शहरात 1802.50 रुपये झाला आहे. अगोदर हा दर 1764.50 रुपये होता. मुंबई शहरात हा व्यावसायिक गॅस सिलिंडर 1644 रुपये झाला आहे. अगोदर हा गॅस सिलिंडर 1605 रुपये होता. इंडियन ऑईल या कंपनीच्या एलपीजीचा हा दर आहे.
घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात बदल झाला का?
1 सप्टेंबरपासून व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात बदल झाले आहेत. घरगुती गॅस सिलिंडरचा दर बदलेला नाही. दिल्लीमध्ये 14.2 किलो वजनाचा घरगुती एलपीजी गॅस सिलिंडर जुन्या दराप्रमाणे 803 रुपयांना मिळत आहे. मुंबईत हा गॅस सिलिंडर दर 802.50 रुपये आहे.





