Breaking news : आता ऑनलाईन नोंद न करता 18 ते 44 वयोगटाला मिळणार करोना लस

नवी दिल्ली – करोना रुग्णांची वाढती संख्या पाहता, आणि तिसऱ्य़ा लाटेची संभाव्य भीती यामुळे देशात करोना लसीकरणावर भर देण्यात येत आहे. करोना प्रतिबंधक लसीकरण मोहिम वेगाने राबविण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार 18 ते 44 वयोगटातील लोकांना करोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करण्याची आवश्यकता नसून त्यांना लसीकरण केंद्रावर लस उपलब्ध होईल.
आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, 18 ते 44 या वयोगटातील नागरिक नोंदणीशिवाय थेट लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेऊ शकतात. तेथे पोचल्यानंतर त्यांची नोंदणी कोविन ॲपवर cowin.gov.in केली जाईल. अनेक ठिकाणी ऑनलाइन स्लॉट बुकिंग केल्यानंतरही लस घेण्यासाठी लोक गैरहजर राहतात. यामुळं लस वाया जाण्याचीही शक्यता असते. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
या व्यतिरिक्त ग्रामीण भागातील लोकांना अद्यापही ऑनलाईन नोंदणी विषयी पुरेशी माहिती नाही. अशा वेळी अडचणी निर्माण होतात. या सगळ्या गोष्टींचा विचार करून केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं हा निर्णय घेतला आहे.
दरम्यान ही सुविधा केवळ सरकारी कोविड लसीकरण केंद्रांवर उपलब्ध असेल. सध्या ही सुविधा खासगी लसीकरण केंद्रांवर उपलब्ध होणार नाही. खासगी केंद्रांमध्ये लसीकरणासाठी अद्याप ऑनलाइन नोंदणीद्वारेच स्लॉट बुक करावे लागतील. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते-ते संबंधित राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांवर अवलंबून आहे की, त्यांना हा निर्णय लागू करायचा आहे की नाही.





