nagar | माझ्याशी तोडपाणी करा, घरपट्टी कमी करतो

शेवगाव (प्रतिनिधी) – प्रभागातील अमीर शेख यांच्या घराची घरपट्टी तब्बल ५ लाख ९५ हजार ६९८ रुपये आकारण्यात आली असल्याने ही घरपट्टी एवढी कशी हे जाणून घेण्यासाठी माजी नगरसेवक उमर शेख नगरपरिषदेत गेले असता नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी आकारणी बरोबर असून तुम्हाला ती कमी करून हवी असेल तर माझ्याशी पैशाची तोडपाणी केली तर मी तुम्हाला हे बिल कमी करून नील दाखला मिळेल.
या मिळकतीचा नगरपालिका उतारा देऊ शकतो, अन्यथा या बिलात कोणतीही तडजोड होणार नाही, असे स्पष्टपणे सांगण्यात आले. त्यामुळे संतप्त माजी नगरसेवकाने प्रभारी मुख्याधिकाऱ्यांकडे तोडपाणी करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या निलंबनाची मागणी करणारे निवेदन दिले, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे
शेवगाव नगर परिषदेचा कारभार सध्या गलथान पद्धतीने सुरू आहे. नगर परिषदेला पूर्णवेळ मुख्याधिकारी नाही. तशात नगरपरिषदेचे कार्यालय गावापासून दीड किलोमीटरवर नेण्यात आले असल्याने कर्मचाऱ्यांवर कोणाचे नियंत्रण राहिले नाही. नागरिकांची कामे होत नाहीत.
कामचा कागद वजन ठेवल्याशिवाय पुढे सरकत नाही. अमीर शेख यांना आलेल्या घरपट्टी रकमेबाबतच्या नोटीसनुसार त्यांचेकडे ३१ मार्च २०२५ पर्यंत होणारी पट्टी तीन लाख ९ हजार ११५ रुपये व त्यावर दोन हजार २१८ रुपये वार्षिक कर अधिक इतर कर ४१८ रुपये असा एकूण वार्षिक कर दोन हजार ६३६ रुपये होतो.
या घरपट्टीच्या होणाऱ्या एकूण रकमेवर दोन लाख ८३ हजार ७५३ व्याजाची आकारणी करून पाच लाख ९५ हजार ६९८ रुपये एकूण घरपट्टीच्या वसुलीची नोटीस पाठविण्यात आली आहे.
वास्तविक ही मिळकतच ४ मार्च १९८० मध्ये विकत घेतली असून त्याचवेळी ग्रामपंचायतीकडे जागेची नोंद लावण्यात येऊन या मिळकतीचे ग्रामपंचायत काळातील सर्वसाधारण कर भरून नियमित केले आहे. त्यावरती ग्रामपंचायत काळातील कोणत्याही प्रकारचे कर बाकी नाही.
शेवगाव नगर परिषदेची स्थापना २०१५ मध्ये झाली याचा अर्थ असा की आकारण्यात आलेली जवळपास तब्बल सहा लाखांची घरपट्टी फक्त ९ वर्षाची कशी होऊ शकते ? हीच बाब संबंधित व्यक्तीच्या निदर्शनास आणून देत असताना त्याने काहीही ऐकून घेण्याची मानसिकता न दाखवता असभ्य वर्तन केले.
२६ जून रोजी नगरपरिषद कार्यालयात त्याने जोरजोरात ओरडून जर तुम्ही माझ्यासी तडजोड करत असाल तर हे बिल कमी होईल, अन्यथा हे बिल कमी होणार नाही.
तुम्हाला काय करायचे ते करा. हे जोरजोरात ओरडून अनेकदा सांगितले असल्याचा मालमत्ताधारक अमर शेख आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा दावा आहे. हे ग्रामस्थ आता इरेला पेटले आहेत. त्यांच्या प्रभागाचे माजी नगरसेवक उमर बशीर शेख यांनी संबंधित कर्मचारी तुर्रबअली शौकतअली सय्यद यांच्या निलंबनाची मागणी केली असून,
तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान अमर शेख यांनी माहिती अधिकारात या दिवसाचे नगरपरिषद कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजची मागणी केली आहे .
पदभार काढून घेतला
दरम्यान या प्रकरणी प्रभारी मुख्याधिकारी लांडगे यांनी अशा पध्दतीने कामकाज करून नागरिकांना वेठीस धरणाऱ्या संबंधीत कर्मचाऱ्याचा मालमत्ता विषयक कर आकारणीचा पदभार काढून त्यास अन्य काम दिले आहे.
यासंदर्भात अधिक माहितीसाठी लांडगे यांचेशी अनेकदा दूरध्वनीवर संपर्क साधूनही त्यांनी त्यास प्रतिसाद दिला नाही .





