Satara | पेरले येथे झाडे तोडताना नियमांना फाटा

सातारा, – रस्त्याच्या कामासाठी पेरले, ता. कराड गावच्या हद्दीतील झाडे तोडण्याची लिलाव प्रक्रिया राबवताना सार्वजनिक बांधकाम विभागाने नियमांना फाटा दिला आहे. त्यामुळे शासनाचा महसूल बुडाला असून, वन विभागाची परवानगी न घेता झाडांची विल्हेवाट लावण्यात आली आहे. ही लिलाव प्रक्रिया चुकीची आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी पेरले येथील अमोल वीर यांनी जिल्हाधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कराड उत्तर कार्यालयाकडून पेरले ते हेळगाव दरम्यान रस्ता रुंदीकरण, डांबीकरण सुरू आहे. त्यासाठी पेरले ग्रामपंचायतीच्या हद्दीतील झाडे तोडण्यासाठी लिलाव प्रक्रिया राबवण्यात आली होती. या पक्रियेत अनियमितता असून, बांधकाम विभागाच्या अधिकार्यांनी नियमांची पायमल्ली केली आहे. या रस्त्यावरील सिल्व्हर ओक या झाडांची तोडणी करण्यासाठी लिलाव प्रक्रिया राबवताना, त्याची कोणत्याही दैनिकात प्रसिद्धी केली नाही.
पेरले ग्रामपंचायतीच्या हद्दीत ही झाडे असतानाही ग्रामपंचायतीला नोटीस देण्यात आली नाही. हणबरवाडी ग्रामपंचायतीमध्ये नोटीस जाहीर न करता केवळ सही व शिक्के घेतले आहेत. यादववाडी ग्रामपंचायतीवर प्रशासक असतानाही, तेथील सरपंचाची सही, शिक्के घेतले आहेत. वन विभागाने 119 झाडांचे मूल्यांकन केले होते. काही झाडे तोडण्याची परवानगी या विभागाने दिली नसतानाही, संबंधित ठेकेदाराने सर्वच झाडे तोडली आहेत.
वन विभागाने वाहतूक परवाना दिला नसतानाही तोडलेल्या झाडांची विल्हेवाट लावली आहे. बांधकाम विभागाचे अधिकारी, ठेकेदारांनी संगनमताने ही प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने राबवल्याने, शासनाचा महसूल बुडाला आहे. परवानगी नसतानाही वाहतूक झाली आहे. मूल्यांकन नसलेली झाडे तोडली आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करून, दोषींवर कारवाई करावी.





