Brendan Taylor : झिम्बाब्वेच्या ब्रँडन टेलरने रचला इतिहास ! सचिन तेंडुलकरचा ‘तो’ विक्रम मोडला
झिम्बाब्वेचा माजी कर्णधार आणि अनुभवी फलंदाज ब्रँडन टेलरने (Brendan Taylor) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करताच असा एक पराक्रम केला आहे, ज्याची कल्पना कदाचित क्रीडा जगताने केली नसेल.

Brendan Taylor : झिम्बाब्वेचा माजी कर्णधार आणि अनुभवी फलंदाज ब्रँडन टेलरने (Brendan Taylor) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करताच असा एक पराक्रम केला आहे, ज्याची कल्पना कदाचित क्रीडा जगताने केली नसेल.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात प्लेइंग ११ मध्ये नाव झळकताच टेलरने (Brendan Taylor) भारताचे महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांचा एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात मोठा विश्वविक्रम मोडीत काढला.
४० वर्षीय ब्रँडन टेलर आता पुरुष एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक प्रदीर्घ काळ खेळणारा जगातील अव्वल खेळाडू ठरला आहे. सचिन तेंडुलकर यांची आंतरराष्ट्रीय एकदिवसीय कारकीर्द २२ वर्षे आणि ३ महिने चालली होती. सचिन यांनी २०१२ मध्ये या फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली होती.
आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध मैदानात उतरताच टेलरची (Brendan Taylor) एकदिवसीय कारकीर्द २२ वर्षे आणि ४ महिन्यांची झाली असून त्याने ‘क्रिकेटच्या देवा’ला या विक्रमात मागे टाकले आहे. मात्र, एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक १८४२६ धावा आणि सर्वाधिक ४६३ सामने खेळण्याचा मास्टर ब्लास्टरचा जागतिक विक्रम आजही अबाधित आहे.
ब्रँडन टेलरने २००४ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. आजवरच्या कारकिर्दीत २०७ एकदिवसीय सामन्यांमध्ये ११ शतके झळकावत झिम्बाब्वेसाठी सर्वाधिक शतकांचा राष्ट्रीय विक्रम त्याच्याच नावावर आहे. २०२१ मध्ये निवृत्ती घेतल्यानंतर २०२२ मध्ये आयसीसीने लाचलुचपत आणि उत्तेजक द्रव्यांसंबंधी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्याच्यावर साडेतीन वर्षांची बंदी लादली होती.
या बंदीची शिक्षा पूर्ण करून २०२५ मध्ये टेलरने निवृत्ती मागे घेत मैदानात पुन्हा पाऊल ठेवले. झिम्बाब्वे, दक्षिण आफ्रिका आणि नामिबिया यांच्या संयुक्त यजमानपदाखाली २०२७ चा एकदिवसीय विश्वचषक रंगणार आहे. आपल्या मायदेशात होणाऱ्या या विश्वचषकात देशाचे प्रतिनिधित्व करण्याच्या प्रचंड जिद्दीने टेलरने (Brendan Taylor) पुनरागमन केले असून, पहिल्याच सामन्यात त्याने इतिहासाच्या पानांवर आपले नाव कोरले आहे.






