Sachin Tendulkar Land Deal : सचिन तेंडुलकरने पुणे जिल्ह्यात खरेदी केली 70 कोटींची जमीन; 3.86 एकर मालमत्ता
Sachin Tendulkar Land Deal : सचिन तेंडुलकरने पुणे जिल्ह्यातील लोणावळ्यात तब्बल 70 कोटी रुपयांची रिअल इस्टेट गुंतवणूक केली आहे. 3.86 एकर जमीन आणि मालमत्तेचा व्यवहार 4 सप्टेंबरला झाला.

Sachin Tendulkar Land Deal : भारताचा माजी दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याने पुणे जिल्ह्यातील लोणावळ्यात तब्बल 70 कोटी रुपयांची रिअल इस्टेट गुंतवणूक केली आहे. 4 सप्टेंबर रोजी या व्यवहारांची नोंदणी झाल्याची माहिती समोर आली आहे. सचिनने एकूण सुमारे 3.86 एकर जमीन खरेदी केली असून, त्यामध्ये बांधकाम असलेली सुमारे 2,100 चौरस फुटांची मालमत्ताही आहे.
मावळ तालुक्यातील या मालमत्तेचे एकूण क्षेत्रफळ सुमारे 15,601.78 चौरस मीटर आहे. नोंदणी कागदपत्रांनुसार, तीन स्वतंत्र कन्वेयंस डीडद्वारे हा व्यवहार करण्यात आला आहे.
तीन व्यवहारांसाठी 70 कोटींचा खर्च – (Sachin Tendulkar Land Deal)
नोंदणी कागदपत्रांनुसार, सर्वात मोठ्या 3.09 एकर जमिनीसाठी सचिन तेंडुलकरने 63.69 कोटी रुपये मोजले आहेत. दुसऱ्या मालमत्तेसाठी 4.56 कोटी, तर तिसऱ्या मालमत्तेसाठी 1.75 कोटी रुपये खर्च करण्यात आले. या तिन्ही मालमत्ता नंदन धनंजय मेहता आणि विवस्वत धनंजय मेहता यांच्याकडून खरेदी करण्यात आल्याची माहिती आहे.
3.09 एकर जमिनीवर सचिनचा 100 टक्के मालकीहक्क आहे. तर उर्वरित दोन मालमत्तांमध्ये सचिनची 50 टक्के भागीदारी असल्याचे कागदपत्रांतून समोर आले आहे. या व्यवहारावर सचिन किंवा विक्रेत्यांकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
लोणावळ्यात सेलिब्रिटींची पसंती –
मुंबईपासून सुमारे 100 किलोमीटर आणि पुण्यापासून सुमारे 60 किलोमीटर अंतरावर असलेले लोणावळा हे महाराष्ट्रातील लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. विशेषतः पावसाळा आणि हिवाळ्यात येथे सेकंड होम, व्हिला, फार्महाऊस आणि जमिनी खरेदी करण्याकडे कल वाढतो. उच्च उत्पन्न गटातील व्यक्ती, सेलिब्रिटी आणि गुंतवणूकदारांकडून लोणावळ्यातील रिअल इस्टेटला मोठी मागणी असल्याचे सांगितले जाते.
सचिनची संपत्ती किती?
सचिन तेंडुलकरने 2013 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. मात्र त्याची ब्रँड व्हॅल्यू कायम असून, ब्रँड एंडोर्समेंट, व्यवसाय आणि गुंतवणुकीतून त्याची कमाई सुरू आहे. विविध अहवालांनुसार सचिनची एकूण संपत्ती सुमारे 1,350 ते 1,500 कोटी रुपयांच्या दरम्यान असल्याचे सांगितले जाते.
मुंबईतील वांद्रे पश्चिम भागात सचिनचा आलिशान बंगला आहे. पेरी क्रॉस रोडवरील या तीन मजली घराचे क्षेत्रफळ सुमारे 6,000 चौरस फूट असून त्याची किंमत 80 ते 100 कोटी रुपयांपर्यंत असल्याचे सांगितले जाते. केरळ आणि लंडनमध्येही सचिनच्या मालमत्ता असल्याची माहिती आहे.
लग्झरी कारचे कलेक्शन –
सचिनला महागड्या आणि लग्झरी कारचीही आवड आहे. त्याच्याकडे BMW i8, BMW 7-Series आणि Ferrari 360 Modena यांसारख्या कार आहेत. Ferrari कार त्याला प्रसिद्ध रेसर मायकल शूमाकरने भेट दिली होती. अलीकडेच सचिनने Porsche 911 Turbo S ही कारही खरेदी केली आहे. त्याच्या कार कलेक्शनची किंमत 35 कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचे सांगितले जाते.





