Brahmachaitanya Maharaj Dindi: गोंदवलेनगरी भक्तिरंगात न्हाऊन निघाली! ब्रह्मचैतन्य महाराजांच्या पायी दिंडी सोहळ्याचे पंढरपूरकडे प्रस्थान
Brahmachaitanya Maharaj Dindi: वेशीवर भाविक आणि ग्रामस्थांनी गळाभेट घेत वारकऱ्यांना दिला भावपूर्ण निरोप; यंदा दिंडीतील भाविकांच्या संख्येत लक्षणीय वाढ.

Brahmachaitanya Maharaj Dindi – ‘ज्ञानोबा माउली तुकाराम’, ‘विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल’ या अखंड नामघोषात श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचा पायी दिंडी सोहळा आज (रविवारी) सकाळी आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे मोठ्या उत्साहात मार्गस्थ झाला. यावेळी हजारो भाविकांच्या उपस्थितीमुळे गोंदवलेनगरी अक्षरशः भक्तिरंगात न्हाऊन निघाली होती. दिंडीत सहभागी होण्यासाठी शनिवारपासूनच समाधी मंदिर परिसरात वारकर्यांची गर्दी उसळली होती.
आज सकाळपासून पारंपरिक पांढरे फेटे, टाळ-मृदुंगाचा गजर, पताकांचा डौल आणि विठ्ठलनामाचा अखंड जयघोष यामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते. समाधी मंदिरात ‘श्रीं’ची समाधी, पादुका व प्रतिमेचे विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर ‘श्री अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय’ या गगनभेदी जयघोषात विश्वस्तांच्या हस्ते श्रींच्या पादुका फुलांनी सजविलेल्या रथात विराजमान करण्यात आल्या.त्यानंतर आरती करण्यात आली.
समाधी मंदिरातून हा दिंडी सोहळा मुख्य रस्त्यावर येताच रथासमोर अश्व, पताकाधारी वारकरी आणि टाळकरी देहभान विसरून नाचू लागले. ‘श्रीराम जय राम जय जय राम’च्या गजरात दिंडीने ग्रामप्रदक्षिणा केली. गावातील प्रमुख चौकांतून जाताना नागरिकांनी रांगोळ्या, फुलवृष्टी आणि आरतीने वारकर्यांचे स्वागत केले. नेहमीप्रमाणे हा दिंडी सोहळा थोरले श्रीराम मंदिराजवळ विसावला.याठिकाणीही आरती व भजन करण्यात आले.
त्यानंतर वैभव चौकातून ही भव्य दिंडी पुन्हा मुख्य रस्त्यावर आली. गावाच्या वेशीवर भाविक आणि ग्रामस्थांनी गळाभेट घेत वारकर्यांना भावपूर्ण निरोप दिला. विठुरायाच्या भेटीची ओढ आणि ‘पुन्हा लवकर या’च्या हाका यामुळे वातावरण भावुक झाले होते. दिंडीत सहभागी भाविकांची संख्या लक्षणीय वाढल्याने सातारा-पंढरपूर महामार्गावर वारकर्यांचा जनसागर पाहायला मिळत होता.





