Bowl Out Rule : बॉल आऊट म्हणजे काय? काय आहेत त्याचे नियम?

इंग्लंडमध्ये 18 जुलै 2025 पासून सुरू झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स स्पर्धेने क्रिकेटप्रेमींचे लक्ष वेधले आहे. स्पर्धेचा पहिला सामना पाकिस्तान चॅम्पियन्स आणि इंग्लंड चॅम्पियन्स यांच्यात झाला, तर दुसरा सामना दक्षिण आफ्रिका चॅम्पियन्स आणि वेस्ट इंडिज चॅम्पियन्स यांच्यात बरोबरीत सुटला. या सामन्याचा निकाल ‘बॉल आऊट’द्वारे (Bowl Out Rule) ठरवण्यात आला. टी-20 क्रिकेटमध्ये सामना बरोबरीत राहिल्यास सुपर ओव्हर खेळवली जाते, परंतु या सामन्याचा निकाल बॉल आऊटने लावण्यात आला. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल बॉल आऊट म्हणजे नेमके काय? चला मग जाणून घेऊया..
बॉल आऊटचा इतिहास
बॉल आऊटचा (Bowl Out Rule) वापर टी-20 क्रिकेटमध्ये यापूर्वीही झाला आहे. सर्वप्रथम 2007 मध्ये न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील सामन्यात बॉल आऊटद्वारे निकाल लागला होता. त्याच वर्षी भारत-पाकिस्तान सामनाही बरोबरीत सुटला आणि बॉल आऊटमुळे भारताने विजय मिळवला होता.
काय आहेत बॉल आऊटचे नियम ?
बॉल आऊट हा साधा पण रोमांचक नियम आहे. सामना बरोबरीत राहिल्यास दोन्ही संघांचे 5-5 गोलंदाज प्रत्येकी एक चेंडू टाकतात. समोर फलंदाज नसतो, फक्त यष्ट्यांमागे यष्टीरक्षक असतो. गोलंदाजाने पूर्ण गोलंदाजी ॲक्शनसह यष्टी उडवायची असते. ज्या संघाचे गोलंदाज जास्त वेळा यष्टी उडवतात, तो संघ विजयी ठरतो. जर दोन्ही संघांनी समान यश मिळवले, तर पुन्हा 5-5 चेंडू टाकण्याची संधी दिली जाते.
भारत-पाकिस्तान सामन्यातील आठवण
2007 च्या आयसीसी टी-20 विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना बरोबरीत सुटला होता. तेव्हा बॉल आऊटद्वारे भारतीय गोलंदाजांनी अचूक निशाण्याने विजय मिळवला होता. पुढे सुपर ओव्हरचा नियम आल्यानंतर बॉल आऊटचा वापर कमी झाला, परंतु वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स स्पर्धेमुळे हा नियम पुन्हा चर्चेत आला आहे.





