Pune : पाण्याच्या टाक्यांना सीमाभिंतीचे संरक्षण

पुणे : महापालिकेकडून शहरात समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या नवीन ५१ , तसेच जुन्या पाणीटाक्यांना संरक्षक भिंत घालण्यात येणार आहेत. यासाठी सुमारे १४ कोटींचा खर्च येणार असून पुढील वर्षभरात हे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
या टाक्यांच्या परिसरात अत्याधुनिक पाणी मीटर तसेच विद्युत यंत्रणेचे साहित्य बसविण्यात आले आहे. मात्र, तेथे संरक्षक भिंत अथवा सुरक्षारक्षक नसल्याने मद्यपी तसेच उपद्रवींकडून साहित्याचे नुकसान केले जाते. अनेकदा टाकीवर मद्यपान करत कचरा तेथेच टाकला जातो. त्यामुळे प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.
समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत शहरात नव्याने ८१ पाण्याच्या टाक्या उभारल्या जाणार आहेत. त्यातील ११ टाक्यांचे काम रद्द झाले, असून ५१ टाक्या पूर्ण आणि १९ टाक्यांची कामे सुरू आहेत. येथे महापालिकेने मीटर, स्वयंचलित व्हाॅल्व तसेच इतर महागडी यंत्रणा उभारली आहे.
त्यासाठी काही ठिकाणी छोट्या खोल्याही तयार केल्या आहेत. मात्र, त्याचे नुकसान केले जात आहे. त्यामुळे सर्व टाक्यांना उंच सीमाभिंत बांधली जाणार असून, त्याच परिसरात सुरक्षा रक्षकासाठी खोलीही तयार केली जाणार आहे.
टाक्यांच्या बांधकामांच्या कामातच या कामाचा समावेश होता. मात्र, संबधित ठेकेदारांनी ही कामे केली नसल्याने त्यांच्याकडून या कामाच्या खर्चासह त्याचा दंड वसूल केला जाणार असून, त्याच पैशांतून या सीमाभिंत उभारल्या जाणार आहेत.




