दोन्ही उपमुख्यमंत्री दिल्लीत; महायुतीच्या जागा वाटपावर होणार चर्चा

Maharashtra Assembly Election 2024 | भाजपने पहिल्या यादीत 99 जणांची नावे जाहीर केली. शिंदे गटाकडून 45, तर अजित पवार गटाकडून 38 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. मात्र अद्याप महायुतीमध्ये काही जागांच्या वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. याबाबत तोडगा काढण्यासाठी भाजपच्या पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा करण्यात येणार आहे.
या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, खा. प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे हे रात्री एकाच विमानाने दिल्लीसाठी रवाना झाले. काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट न झाल्याने जागा वाटपावरच आज चर्चा होणार आहे. महायुतीमध्ये शिंदेंच्या तुलनेत अजित पवारांना कमी जागा येण्याची शक्यता आहे.
अजित पवारांकडून 38 उमेदवार घोषित
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने 38 जागांवर उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. राष्ट्रवादीच्या उमेदवार यादीत येवल्यातून छगन भुजबळ आणि कागलमधून हसन मुश्रीफ यांना तिकीट देण्यात आले आहे. त्याचवेळी अजित पवार स्वतः बारामतीतून निवडणूक लढवणार आहेत.
दरम्यान, काही कारणास्तव एकनाथ शिंदे दिल्लीला जाऊ शकले नाहीत, त्यामुळे अमित शाह यांच्याबरोबरची तिन्ही पक्षांच्या नेत्यांची बैठक होऊ शकली नाही. फडणवीस, अजित पवार, पटेल, तटकरे आणि नागपूरहून पोहोचलेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना त्यामुळे दिल्लीतच मुक्काम करावा लागला. आता शाह यांच्यासोबत आज गुरुवारी सकाळी बैठक होणार आहे.
आत्तापर्यंत महायुतीकडून 182 जागांवर उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या बैठकीत उरलेल्या 106 जागांवर चर्चा होऊन जागा वाटप केली जाण्याची शक्यता आहे.
हेही वाचा:
यूपी पोटनिवडणूक । अखिलेश यादव यांनी इंडिया युती तोडण्याच्या अटकळांवर लगावला पूर्णविराम





