बोईसर दरोड्याप्रकरणी दोघांना ‘अटक’; पोलीसांच्या 15 पथकांचं 3 राज्यात सुरू होतं ‘सर्च ऑपरेशन’

पालघर – बोईसर येथील मंगलम ज्वेलर्स या सराफा पेढीवर दरोडा घालून सात कोटी 60 लाख रुपयांचा मुद्देमाल पळविणाऱ्या दोन आरोपींना जेरबंद करण्यात पालघर पोलिसांना यश आले आहे. बोईसर येथील चित्रालय परिसरात 30 डिसेंबर 2019 रोजी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली होती.
शेजारच्या दुकानातून सराफा पेढीत प्रवेश करून चोरट्यांनी मुद्देमाल लंपास केला होता. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पालघर पोलिसांनी 15 पथके नियुक्त केली होती. त्यापैकी चार पथके झारखंड, पश्चिम बंगाल आणि नेपाळ येथे तपासासाठी रवाना आली होती.
दरम्यान, झारखंडमधील साहिबगंज जिल्ह्यातून दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून 334 ग्रॅम सोने आणि साडेपाच लाख रुपये रोख असा एकूण साडेएकोणीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या दरोड्याच्या सूत्रधारासह अन्य काही आरोपी फरार असून त्यांच्या शोधासाठी पालघर जिल्हा पोलिसांनी सहा अतिरिक्त पथके स्थापन केली आहेत. पोलिसांची नेपाळ सीमालगतच्या भागांत विशेष पाळत असल्याचे अधीक्षक दत्तात्रेय शिंदे यांनी सांगितले.





