Boston Marathon Sportsmanship : स्वप्न विक्रमाचं होतं, पण धावून आले माणुसकीसाठी! बोस्टन मॅरेथॉनमध्ये दोन धावपटूंनी कोसळलेल्या स्पर्धकाला दिला खांदा
Boston Marathon Sportsmanship : स्वतःचा वैयक्तिक विक्रम खुंटीवर टांगून दोन धावपटूंनी एका थकून कोसळलेल्या स्पर्धकाला अंतिम रेषा ओलांडण्यासाठी केलेली मदत सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरत आहे

Boston Marathon Sportsmanship 2026 Video Viral : बोस्टन मॅरेथॉनच्या इतिहासात खेळाडूवृत्तीचे आणि माणुसकीचे एक अभूतपूर्व दर्शन घडले आहे. स्वतःचा वैयक्तिक विक्रम (Personal Best) खुंटीवर टांगून दोन धावपटूंनी एका थकून कोसळलेल्या स्पर्धकाला अंतिम रेषा ओलांडण्यासाठी केलेली मदत सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरत आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून त्या दोघांवर कौतुकांचा वर्षाव होत आहे.
नेमकं काय घडलं?
बोस्टन मॅरेथॉनच्या २६ व्या मैलावर (सुमारे ४१.८ किमी) जेव्हा अजय हरिदास नावाचा धावपटू थकव्यामुळे कोसळला, तेव्हा विजयाची रेषा हाकेच्या अंतरावर होती. हरिदास वारंवार उभे राहण्याचा प्रयत्न करत होता, पण त्यांचे शरीर साथ देत नव्हते. डझनभर धावपटू त्यांच्या मागून पुढे निघून गेले, मात्र उत्तर आयर्लंडच्या ‘नॉर्थ डाऊन ॲथलेटिक क्लब’चा सदस्य ॲरॉन बेग्ज याच्यातील खरा खेळाडू पाहिला मिळाला.
A runner cramped up just before the finish line at the Boston Marathon, and a few other runners stopped to help him get across. pic.twitter.com/sCVzFJpNpz
— Dudes Posting Their W’s (@DudespostingWs) April 22, 2026
विक्रमापेक्षा माणुसकी मोठी –
ॲरॉनने हरिदासला जमिनीवरून उचलले, पण हरिदासला स्वतःचा तोल सावरता येत नव्हता. त्याच वेळी रॉबसन डी ऑलिव्हिएरा हा धावपटू तिथे पोहोचला. रॉबसन हा त्याच्या आयुष्यातील सर्वात वेगवान मॅरेथॉन पूर्ण करण्याच्या उंबरठ्यावर होता. मात्र, स्वतःचा विक्रम मोडीत निघत असतानाही त्याने न कचरता बेग्जला मदत केली. या दोघांनी हरिदासला दोन्ही बाजूंनी खांदा दिला आणि फिनिशिंग लाईन ओलांडून दिली.
जगभरातून कौतुकाचा वर्षाव –
या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला असून, एका पोस्टला २० लाखांहून अधिक व्ह्यू मिळाले आहेत. ॲरॉन बेग्जने आपल्या बंगोर येथील घरातून संवाद साधताना सांगितले की, “मॅरेथॉन हा एक एकत्रित प्रवास आहे. एकमेकांना मदत करणे हा नैसर्गिक स्वभाव आहे. २०१६ मध्ये ब्राउनली बंधूंनी ट्रायथलॉनमध्ये जे केले होते, त्याची आठवण मला झाली. चांगले वागण्यातच आनंद असतो.”
ॲरॉनच्या क्लबने त्याचे ‘सुपरस्टार’ आणि ‘खरा सभ्य गृहस्थ’ म्हणून वर्णन केले आहे. स्वतःच्या शर्यतीची पर्वा न करता दुसऱ्याला सावरणाऱ्या ॲरॉन-रॉबसन जोडीने खेळाडूवृत्तीचा एक नवा आदर्श जगासमोर ठेवला आहे.





