“राष्ट्रवादीच्या विरोधामुळे बोरवणकरांची बदली करता आली नाही’; पृथ्वीराज चव्हाण यांचा गौप्यस्फोट

Prithviraj Chavan – राष्ट्रवादीच्या विरोधामुळे मीरा बोरवणकरांची (Meera borwankar) “सीआयडी’मध्ये बदली करता आली नव्हती, असा गौप्यस्फोट माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. मीरा बोरवणकर यांनी पत्रकार परिषदेत माझे कुटुंब पुण्यात होते. म्हणून “सीआयडी’चे प्रमुखपद रिक्त असून मला ते दिले जावे अशी विनंती मी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांना केली होती असे म्हणाल्या होत्या.
पुण्याच्या माजी पोलिस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. पोलिसांची जमीन देण्यास विरोध केल्यामुळे करिअरवर परिणाम झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. चव्हाणांनी आघाडीबरोबरच आर.आर. पाटलांवर ठपका ठेवला आहे. पुण्यातील येरवडा येथील पोलिसांची जमीन शाहीद बाजवा या बिल्डरला हस्तांतरित करण्यास अजित पवारांनी सांगितले होते.
पण, मी त्याला विरोध केला असा दावा मीरा बोरवणकर यांनी केला आहे. यामुळे मला पुण्यातील “सीआयडी’चे प्रमुखपद मिळाले नाही, असा आरोप बोरवणकर यांनी केला आहे. याबाबत चव्हाण म्हणाले की, बोरवणकर यांची पोलिस आयुक्तपदावरून बदली करताना प्रोटोकॉलप्रमाणे माझ्या कार्यालयातील कुणीतरी त्यांच्याशी संपर्क केला असावा.
त्यांना पुण्यातच गुन्हे अन्वेषण विभागात नियुक्ती हवी होती. पण तत्कालीन गृहमंत्र्यांनी (आर.आर. पाटील) त्याला विरोध केला होता. मित्र पक्षाच्या (राष्ट्रवादी कॉंग्रेस) विरोधामुळे त्यांची “सीआयडी’मध्ये बदली करता आली नव्हती, असेही चव्हाणांनी म्हटले आहे.





