Boriv Akoshi Road: जीव मुठीत धरून प्रवास! बोरीव-आकोशी रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य; थेट मंत्र्यांकडे तक्रार
Boriv Akoshi Road: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बेजबाबदार कारभारामुळे साईडपट्ट्या उखडल्या; खड्ड्यांमुळे किरकोळ अपघातांच्या संख्येत वाढ.

Boriv Akoshi Road – पश्चिम भागातील बोरीव ते आकोशी रस्त्यावरील साईडपट्ट्या न भरल्यामुळे या रस्त्यावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. रस्ता आणि साईडपट्ट्यांमधील अंतर जास्त असल्याने हा रस्ता मृत्यूचा सापळा ठरत आहे. अनेक ठिकाणी खोल खड्डे पडले असून, वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. विशेषतः दुचाकीस्वार, शालेय विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना या मार्गावरून जाताना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे.
किरकोळ अपघातांची संख्या वाढली असून, एखादी मोठी दुर्घटना घडल्याशिवाय प्रशासनाला जाग येणार नाही का, असा संतप्त सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. ग्रामस्थांच्या मते, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बेजबाबदार कारभारामुळे रस्त्याची साईडपट्टी उखडली आहे. याशिवाय खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यास मोठे अपघात होऊ शकतात. तरीदेखील संबंधित विभागाकडून कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. या गंभीर समस्येबाबत ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देऊन दुरुस्तीची मागणी केली आहे.
तसेच या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी सातारा, तहसीलदार वाई, वाई पोलीस स्टेशन, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनाही पाठविण्यात आल्या आहेत. प्रशासनाने तातडीने साईडपट्टी दुरुस्तीचे काम हाती घेतले नाही तर तीव्र लोकआंदोलन छेडण्यात येईल. संभाव्य अपघातांमध्ये जीवितहानी झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागावर राहील, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.





