बोरिस जॉन्सन यांचा खळबळजनक दावा; म्हणाले,“पुतिन यांनी दिली होती ब्रिटनवर हल्ल्याची धमकी”

लंडन : ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्याविषयी एक खळबळजनक दावा केला आहे. जॉन्सन यांनी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनवरील हल्ल्याच्या अगोदर ब्रिटनवर मिसाईल हल्ला करण्याची धमकी दिली होती. बीबीसी आज ‘पुतिन वर्सेस द वेस्ट’ नावाचा एक नवीन माहितीपट प्रसारित करणार आहे. या माहितीपटानुसार २४ फेब्रुवारी रोजी रशियाने युक्रेनवर हल्ला करण्याच्या एक दिवस आधी व्लादिमीर पुतिन यांनी जॉन्सन यांना फोन केला होता आणि त्यांना मिसाईल हल्ला करून जीवे मारण्याची धमकी दिली होती.
ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी,“त्यांनी मला एक प्रकारे धमकी दिली, पुतिन म्हणाले की, बोरिस मला तुमचं नुकसान करायचं नाही, परंतु मिसाईल (क्षेपणास्त्र) हल्ल्याने असं करायला मला केवळ एक मिनिट लागेल.” असे त्यांनी म्हटले. जॉन्सन आणि इतर पाश्चिमात्य देशांमधील नेते युक्रेनला समर्थन दर्शवत आहेत. तसेच रशियाचे हल्ले रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. जॉन्सन हे युक्रेनचे राष्ट्रपती वलोदिमीर झेलेंस्की यांचे समर्थक आहेत.
माहितीपटात बोरिस जॉन्सन यांनी सांगितले की, युक्रेनवरील हल्ल्याच्या आधी मी पुतिन यांना समजवण्याचा प्रयत्न केला होता. युक्रेन नॉर्थ अॅटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन म्हणजेच नाटोमध्ये सहभागी होण्याची शक्यता नाही, असेही मी पुतिन यांना सांगितले होते.
जॉन्सन यांनी, मी त्यांना (पुतिन) म्हटलं होतं की, तुम्ही युक्रेनवर हल्ला केलात तर तुमचा थेट सामना नाटोशी होईल. हा हल्ला करून तुम्ही नाटोपासून लांब नाही राहू शकत. तसेच तुम्ही जर युक्रेनवर हल्ला केलात तर रशिया देखील अडचणीत सापडेल. कारण पाश्चिमात्य देश रशियावर बंदी घालतील. तसेच नाटोचे रशियाच्या सीमेवरील सैन्यबळ वाढवले जाईल, असे म्हटले.





