‘अपडेटचा’ कंटाळा; पुणे महापालिकेच्या दाव्यांवर परिणाम

पुणे – न्यायालयात प्रलंबित असलेल्या दाव्यांबाबत विविध विभागांच्या नोडल ऑफिसरच्या बदली अथवा बढतीनंतर ती माहिती अपडेट केले जात नसल्याने महापालिकेच्या खटल्यांवर परिणाम होत आहे. यासाठी महापालिकेच्या मुख्य विधी अधिकारी मंजुषा इधाटे यांच्या उपस्थितीत सर्व नोडल ऑफिसर, पॅनेलवरील वकिलांची गुरुवारी संयुक्त बैठक होणार आहे. त्यात प्रलंबित खटल्यांचा आढावा घेतला जाणार आहे.
महापालिकेने न्यायालयात दाखल केलेले दावे अथवा विरोधात दाखल दाव्यांची संख्या काही हजारांत आहे. या दाव्यांच्या तारखा अगदी महापालिका न्यायालय, एनजीटी, उच्च आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरू आहेत. हे दावे लढण्यासाठी महापालिकेने वकिलांचे पॅनेल तयार केले आहे.
यासंदर्भात कामकाज पाहण्यासाठी सप्टेंबर 2014 मध्ये सर्व खात्यांमध्ये नोडल ऑफिसरची नेमणूक करण्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे; परंतु नोडल ऑफिसरची बढती अथवा बदली झाल्यास नव्याने नियुक्त नोडल ऑफिसरची माहिती बरेचदा विधी विभाग आणि वकिलांपर्यंत वेळेत पोहोचत नाही.
नोडल ऑफिसरचे नाव, मोबाइल क्रमांक माहिती नसल्याने पॅनेलवरील वकिलांना ऐनवेळी कोर्टात अडचणींना सामोरे जावे लागते. यावर ही बैठक होणार आहे.



