पुणे | बोपदेव घाट बलात्कार प्रकरणी तपास शून्य

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – बोपदेव घाटातील सामूहिक बलात्कार प्रकरणात पोलिसांकडून सखोल तपास करण्यात येत आहे. तसेच बोपदेव घाटात नागरिकांना अडवून लूटमार तसेच फिरायला येणाऱ्या तरुणीचा विनयभंग प्रकरणात गुन्हे दाखल असलेल्या सराईतांची चौकशी सुरु करण्यात आली आहे.
बलात्कार प्रकरणातील आरोपींचा माग काढण्यासाठी पोलिसांनी सुमारे ७० पथके तयार केली आहेत. गेल्या पंधरा दिवसात बोपदेव घाटमार्गे गेलेल्या तीन हजार मोबाइल वापरकर्त्यांची माहिती संकलित करण्यात आली असून, या माहितीचे तांत्रिक विश्लेषण सुरु करण्यात आले आहे.
बोपदेव घाटातील माेबाइल संपर्क यंत्रणा क्षीण असल्याने तांत्रिक तपासात अडथळे आले आहेत. आरोपी सासवडमार्गे पसार झाल्याची शक्यता आहे. घटनास्थळापासून ७० ते ८० किलोमीटरपर्यंतचे सीसीटीव्ही चित्रीकरण पोलिसांकडून तपासण्यात येत आहे.
तांत्रिक तपासात महत्त्वाची माहिती मिळाली नसल्याने पोलिसांनी पुणे शहर, ग्रामीण भागातील खबऱ्यांचे जाळे पुन्हा कार्यरत केले आहे. पसार आरोपींची माहिती मिळवण्यासाठी गावातील पोलीस पाटील, तसेच सरपंचांची मदत घेण्यात येणार आहे.
आरोपींची माहिती देणाऱ्यास दहा लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. पोलिसांनी घटनास्थळावरुन रक्ताचे नमुने, बांबू, तसेच अन्य साहित्य जप्त केले आहे. संबंधित नमुने तपासणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.





