प्रतिनिधी
कोव्हिड- सन 2020 च्या पहिल्या तिमाहीपासून ज्याबद्दल ठिकठिकाणी चर्चा चालू आहे, ज्यामुळे घरे, व्यवसाय, अर्थव्यवस्था सारेच विस्कळीत झाले आहे असा ज्वलंत विषय.
या विषयाच्या अनुषंगाने लेखन व तेही सकारात्मक दृष्टिकोन ठेवून करणे म्हणजे जणू शिवधनुष्य उचलणे होय. पण पुस्तक वाचल्यावर डॉ. म्हैसेकर यांनी हे शिवधनुष्य उचललेच नव्हे तर त्याला लीलया प्रत्यंचा लावून बाण सोडून तुम्हा आम्हा सर्वांना मार्गही दाखवला आहे.
या पुस्तकात कोव्हिडचा प्रवेश, प्रतिबंधाची त्रिसूत्री, निदान व चाचण्या, उपचार, मानसिक स्वास्थ्य, कोव्हिड पश्चात आजार, लसीकरण, कोव्हिडसह जीवन यासह राज्य सरकारची त्रिस्तरीय रचना व स्वयंसेवी संस्थांची भूमिका आणि मिथके व तथ्य या विविध बाबींचा उहापोह चांगल्या प्रकारे कोणतेही पाल्हाळ न लावता व शास्त्रीय संदर्भासह केलेला आहे.
सदर पुस्तकाची वैशिष्ट्ये-
1) सोपी व सर्वांना समजेल अशी भाषा
2) विषयाची उत्तम मांडणी
3) तांत्रिक विषयांचे बाबतीत शास्त्रीय आधार
4) आवश्यक तेथे चित्रे व तक्ते (तेही सुटसुटीत)
5) सुबक छपाई
6) पुस्तकाचा आशय दर्शविणारे छान मुखपृष्ठ
7) मिथकांना व लसीकरणास अनुसरून प्रश्नोत्तरे स्वरूपात मांडणी (यामुळे वाचनीयतेत भर पडली आहे)
8) विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नेटकी प्रस्तावना व केलेले कौतुक आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या तसेच
डॉ. संजय ओक, शशांक जोशी आणि राहुल पंडित (अनुक्रमे अध्यक्ष व सदस्य, कोव्हिड राज्य कृती गट) यांच्या शुभेच्छा लाभल्या आहेत.
या सन्माननीय डॉक्टर त्रयीने या पुस्तकाच्या माध्यमातून लेखक डॉ. म्हैसेकर यांनी नीरक्षीर विवेकाने विचार आणि शास्त्रीय सत्य उलगडून दाखवल्याचा, भीती आणि निष्काळजीपणा यांचा मध्य गाठून मार्गदर्शन केल्याचा व कोव्हिडसंदर्भातील सर्व शंकांचे निरसन अत्यंत मुद्देसूदपणे केल्याचे नमूद केले आहे.
पुस्तक वाचल्यावर या सर्व मान्यवरांनी केलेले कौतुक व उल्लेख यास लेखक हे निश्चितच 100 टक्के पात्र आहेत याची सत्यता पटते.
हे पुस्तक सर्वसामान्य जनतेसाठी तर उपयुक्त आहेच; पण सर्व शासकीय आस्थापनांसाठी एक अत्यावश्यक ठेवा आहे, असे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही.
लेखक डॉ. दीपक म्हैसेकर
प्रकाशक – विश्वकर्मा पब्लिकेशन्स
पृष्ठे 126