साताऱ्यात पाच जानेवारीपासून ग्रंथ महोत्सव

डॉ. यशवंत पाटणे व शिरीष चिटणीस यांची माहिती; विविध कार्यक्रमांची रेलचेल
सातारा – जिल्हा ग्रंथ महोत्सव समितीच्या वतीने दि. 5 ते 8 जानेवारी दरम्यान साताऱ्यात जिल्हा परिषद मैदानावर ग्रंथ महोत्सव 2024 च्या आयोजन करण्यात आले असल्याची माहिती येथील दीपलक्ष्मी सभागृहामध्ये ग्रंथ महोत्सव संयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. यशवंत पाटणे व कार्यवाह शिरीष चिटणीस यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी संयोजन समितीचे पदाधिकारी डॉ राजेंद्र माने, कोषाध्यक्ष प्रदीप कांबळे, विनायक लांडगे, सुनीता कदम इत्यादी उपस्थित होते.
शिरीष चिटणीस यांनी ग्रंथ महोत्सवाची माहिती देताना सांगितले की, दि. 5 जानेवारी रोजी राजवाडा येथून सकाळी साडेआठ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत ग्रंथ दिंडी काढण्यात येणार आहे . खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी,जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख ,तसेच जिल्ह्यातील आमदार खासदार हे ग्रंथदिंडीला उपस्थित राहणार आहे .
त्यानंतर विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी यांच्या हस्ते सकाळी 11 वाजता ग्रंथ महोत्सवाचे उदघाटन होणार आहे. अध्यक्षस्थानी खा. उदयनराजे भोसले तर सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, सुप्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे, शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. दुपारी २ वाजता कथाकथन कार्यक्रम होणार असून यामध्ये कथाकार सुरेश शिंदे व पौर्णिमा हुंडीवाले सादरीकरण करणार आहेत. ज्येष्ठ पत्रकार रामदास मेहुलकर अध्यक्षस्थानी आहेत. लेखक आणि वक्ते स्वप्निल पोरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
सायंकाळी सात वाजता बापलेक या सुरेल संवाद कार्यक्रमात ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे, अभिनेत्री ऋग्वेदी प्रधान सहभागी होणार आहेत. दि. 6 जानेवारी रोजी सकाळी साडेआठ वाजता ‘धमाल गप्पा टप्पा गोष्टी गाणी’ हा कार्यक्रम बालसाहित्यिक एकनाथ आव्हाड व प्रसिद्ध कवयित्री लता अहिवळे सादर करणार आहेत. वरिष्ठ पोलीस अशोक इंदलकर अध्यक्षस्थानी आहेत. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे सहसचिव प्राचार्य डॉ. राजेंद्र शेजवळ हे अध्यक्षस्थानी आहेत. सकाळी अकरा वाजता कवी संमेलन होणार असून जनकवी संतोष काळे व शिवाजी सातपुते प्रमुख सहभागी होणार आहेत. जिल्हा उपनिबंधक मनोहर माळी व सातारा शहर पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, प्रमुख पाहुणे असणार आहेत.
दुपारी साडेतीन वाजता यापुढे मराठी साहित्याचे वारसदार कोण या विषयावर परिसंवाद होणार आहे अध्यक्ष आणि जेष्ठ विचारवंत प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे, प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे प्रमुख पाहुणे आहेत. या कार्यक्रमात डॉ. संदीप सांगळे, विनोद कुलकर्णी, रवींद्र खंदारे इतर सहभागी होणार आहेत. सायंकाळी साडेसहा वाजता ‘गाणी मनातील’ हा कार्यक्रम डॉ. सुनील पटवर्धन, प्रिया अघोर, विजय साबळे सादर करणार असून माजी उपनगध्यक्ष दत्तात्रय बनकर व ज्येष्ठ पत्रकार दीपक शिंदे प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी सात वाजता भारुड कार्यक्रमात ‘ओवी ते अभंग, भारुड ते पोवाडा’ साहित्यातील रंग हा कार्यक्रम डॉ. भावार्थ देखणे आणि सहकारी सादर करणार आहेत. माजी उपनगराध्यक्ष प्रकाश गवळी, माजी उपनगराध्यक्ष अविनाश कदम, ज्येष्ठ पत्रकार राजेश सोळस्कर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
७ जानेवारी रोजी सांस्कृतिक कार्यक्रम
दि. ७ जानेवारी रोजी सकाळी साडेआठ वाजता होणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांच्या आनंददायी सांस्कृतिक कार्यक्रमाचे उदघाटन शिक्षणाधिकारी शबनम मुजावर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्राचार्य डॉ. वंदना नलावडे व मुख्याध्यापिका अनघा कारखानीस उपस्थित राहणार आहेत. दुपारी साडेतीन वाजता रानकवी ना .धो. महानोर व डॉ. विश्वास बेंद्रे व हभप बाबामहाराज सातारकर यांच्या स्मृती शब्दांजलीपर ‘आठवणींच्या हिंदोळ्यावर’ हा कार्यक्रम साहित्य संस्कृती मंडळाचे राज्यसदस्य प्रदीप पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे .सायंकाळी सात वाजता ‘बहारो गीत बरसाओ’ हा गाण्याचा कार्यक्रम होणार आहे.
८ जानेवारी रोजी ग्रंथ महोत्सव समारोप
दि. ८ जानेवारी रोजी ‘इथे घडतात वाचक वक्ते मला आवडलेले पुस्तक’ या कार्यक्रमात सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष व पुणे विभागीय अधिस्वीकृत समितीचे अध्यक्ष हरीश पाटणे हे प्रमुख वक्ते असून पुणे सहाय्यक ग्रंथालय संचालक शालिनी हिंगोली प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. डॉ. संदीप क्षोत्री हे परीक्षक वक्ते आहेत. जिल्ह्यातून अनेक वाचक वक्त या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. दुपारी अडीच वाजता ग्रंथ महोत्सव समारोप कार्यक्रम ज्येष्ठ साहित्यिक रामदास फुटाणे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले व पोलीस अधीक्षक समीर शेख हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. अशोक भोईटे हे अध्यक्षस्थानी असतील. सायंकाळी सात वाजता ‘आठवणीतले स्वर’ हा संगीत कार्यक्रम होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत कात्रे व जेष्ठ पत्रकार दीपक प्रभावळकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.





