‘बॉम्बे इज नॉट अ महाराष्ट्र सिटी’; बड्या नेत्याच्या विधानाने वाद, राऊतांनी टोचले कान; मुंबईत काय घडलं?

Annamalai : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली असून, जोरदार प्रचारमोहीम राबविली जात आहे. ही निवडणूक भाजपसाठी अत्यंत महत्वाची असून, राजकीय समीकरणांची रणनिती आखली जात आहे. उमेदवारांच्या प्रचारासाठी भाजपमधील बड्या नेते मैदानात उतरले होते. या सगळ्या धामधूमीत भाजपच्या एका बड्या नेत्यांने केलेल्या विधानाने वादाला तोंड फुटले आहे.
‘बॉम्बे इज नॉट अ महाराष्ट्राज सिटी’ म्हणजेच मुंबई हे महाराष्ट्राचं शहर नाही, असे विधान भाजप नेते अण्णामलाई यांनी केले असून, यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. सोशल मीडियावर असे विधान केल्याचा एक व्हिडीओ शिवसेना उबाठाने शेअर केला आहे. मुंबई महापालिका निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक असताना भाजपच्या एका मोठ्या नेत्याने अशा प्रकारचे विधान केल्याने भाजपची अडचण वाढली आहे.
खरंतर मुंबईत मराठीसह अमराठी मतदार देखील आहेत. या मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपकडून त्या-त्या राज्यातील लोकांना मुंबईत प्रचारासाठी बोलवण्यात येत आहे. याच प्रचारात असताना भाजप नेते अण्णामलाई यांनी हे विधान केले आहे. एका स्थानिक वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना त्यांनी हे विधान केले आहे. त्यांनी केलेल्या विधानानंतर आता विरोधक त्यांच्यावर टीकीचे झोड उठवत आहेत.
शेवटी पोटातलं ओठांवर आलंच… भाजपाला आम्ही शेवटचं सांगतोय, निवडणुका गेल्या तेल लावत पण मुद्दामहून असल्या बांडगुळांना आणून मराठी माणसाला चिथावू नका… पुन्हा तुमचा कुणी भाजपावाला मुंबादेवीच्या मुंबईला बॉम्बे म्हणाला आणि बलिदान देऊन मिळवलेल्या मुंबईवरून मराठी माणसालाच हिणवलं तर… pic.twitter.com/EVp9SA8QhM
— Akhil Chitre अखिल चित्रे (@akhil1485) January 9, 2026
नेमकं काय म्हणाले अण्णामलाई?
“आम्हाला इथं ट्रिपल इंजिनचं सरकार हवं आहे. मुंबई हे देशातील एकमेव शहर आहे, जिथे ट्रिपल इंजिनचं सरकार असू शकतं. मोदीजी केंद्रात, देवेंद्र फडणवीस राज्यात आणि मुंबईत भाजपचा महापौर पाहिजे. कारण मुंबई हे महाराष्ट्राचं शहर नाही, (बॉम्बे इज नॉट महाराष्ट्राज सिटी) ते आंतरराष्ट्रीय शहर आहे. या शहराचं बजेट ७५ हजार कोटी इतकं आहे, हा काही कमी पैसा नाही. चेन्नईचं बजेट ८ हजार कोटी आहे. तर बंगळुरूचं १९ हजार कोटी आहे. त्यामुळे तुम्हाला प्रशासनात चांगले लोक बसवायला पाहिजे, जेणेकरून ते शहराच्या बजेटचा योग्य वापर होईल.”
राऊतांची संतप्त प्रतिक्रिया
अण्णामलाई यांनी केलेल्या वक्तव्यानंतर संजय राऊत यांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. हा १०६ हुतात्म्यांचा अपमान आहे. त्याला अटक करून मुंबईच्या बाहेर जाऊ दिलं नाही पाहिजे. अण्णा सरकारच्या थोबाडात मारून गेला. देवेंद्र फडणवीसांनी याचं उत्तर द्यायला हवं, अशी संतप्त प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.





