प्रभात वृत्तसेवा पुणे – भाजपच्या पाच वर्षांच्या सत्ता काळात पुणे शहर हे समस्यांचे शहर बनले आहे. वाहतूक कोंडी, पिण्याचे पाणी, शिक्षण, ड्रग्ज, गुन्हेगारी यांसारख्या गंभीर समस्या यांच्या काळात निर्माण झाल्या आहेत. पाच वर्षांचा सत्ता काळ आणि चार वर्षांच्या प्रशासन काळात या भाजपने महापालिकेला अक्षरश: ओरबाडून खाल्ले आहे, अशी टीका काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केली. पूर्वी हे लोक काँग्रेसमुक्त भारतची घोषणा देत होते; परंतु आता पुण्याला भाजपमुक्त करून पुणेकरच त्यांना त्यांची जागा दाखवून देतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या वेळी काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष अजित दरेकर, प्राची दुधाणे उपस्थित होते.२०१९ मध्ये ज्या वेळी पूर आला होता. त्या वेळी राज्य सरकारकडून १६५ कोटी आले होते. हे पैसे राज्य सरकारला परत गेले. २०१६ साली पाणीपुरवठा योजना आणली. ही योजना कार्यान्वित न होताही, पाणीपट्टीमध्ये पाच-पाच टक्क्यांची कर वाढ केली आणि दहा वर्षे ही पाणीपट्टी वाढ नागरिकांकडून वसूल केली आहे. आजही ही योजना केवळ कागदावर असून कामे न करताच ठेकेदारांना पैसे दिले आहेत, असा आरोपही शिंदे यांनी केला.नदी सुधार प्रकल्पासाठी साडेआठशे कोटींचे अनुदान असतानाही ६६१ कोटींचा अतिरिक्त भार महापालिकेने करदात्यांवर लादला आहे. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, ५५ किलोमीटरच्या वाहिन्या यांचे नियोजन असूनही निविदांची अंमलबजावणी झाली नाही. नदी सुधारणा करण्याएवजी ते सुशोभीकरण करून केवळ बाहेरून मलमपट्टी करण्याचे काम केले आहे. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची निविदा तेराशे कोटींवरून अचानक आठराशे कोटी केली. या निविदेत पाचशे कोटींची फुगीर वाढ झाली कशी? हा गंभीर प्रश्न आहे, अशी टीकाही शिंदे यांनी केली. करोना काळात ९५६ पीएमपीएलच्या बस नऊ महिने एका जागेवर उभ्या होत्या. या बस चालू नसल्याने ठेकेदारांना पैसे देणे अपेक्षित नव्हते. महापालिकेच्या शाळांचे एकत्रिकरण करून उर्वरित शाळांचे खासगीकरण करण्याचा घाट घालण्यात आला आहे, असा आरोपही शिंदे यांनी केला.