मुंबईचे डबेवाले ब्रिटनच्या राज्याला देणार ‘हे’ खास गिफ्ट; महाराष्ट्राच्या संस्कृतीचे होणार दर्शन…

मुंबई – ब्रिटनचा राजा चार्ल्स यांचा राज्याभिषेक समारंभ लवकरच होत असून त्यासाठी मुंबईतल्या डबेवाल्यांनी मंगळवारी विशेष भेटवस्तू खरेदी केली आहे. लंडनमधील वेस्टमिन्स्टर ऍबे येथे 6 मे रोजी 74 वर्षीय राजा चार्ल्स यांचा औपचारिकपणे राजा म्हणून राज्याभिषेक होणार आहे. त्यांना भेट देण्यासाठी डबेवाल्यांनी पुणेरी पगडी आणि वारकरी समाजाची शाल खरेदी केली.
पुणेरी पगडी अभिमानाचे आणि सन्मानाचे प्रतीक मानली जाते. पुणेरी पगडीला 2009 मध्ये भौगोलिक संकेताचा दर्जा देण्यात आला आहे. एएनआयशी बोलताना डबेवाल्यांनी सांगितले की, त्यांना ब्रिटीश वाणिज्य दूतावास आणि ब्रिटीश दूतावासाने आमंत्रणे पाठवली आहेत.मुंबईच्या डबेवाल्यांचे ब्रिटिश राजघराण्याशी चांगले संबंध आहेत.
त्यांच्या लग्नातही दोन डबेवाल्यांना आमंत्रित करण्यात आले होते. ही आमच्यासाठी सन्मानाची गोष्ट होती. तो राजा होणार आहे. त्यामुळे, आम्ही राजा चार्ल्सला पुणेरी पगडी आणि शाल भेट देऊ इच्छितो असे मुंबई डबेवाल्यांचे प्रतिनिधी विष्णू काळडोके यांनी सांगितले. मुंबईचे डब्बेवाले या महानगरात जेवणाच्या डब्यांची वेळेवर डिलिव्हरी आणि रिटर्न सिस्टमसाठी जगभरात प्रसिद्ध आहेत.





