Bomb Threats: चार विमानांमध्ये बॉम्बची धमकी, एअर इंडियाचे दिल्लीहून शिकागो जाणारे विमान कॅनडाला वळवले

Bomb Threats: सोशल मीडिया पोस्टद्वारे मंगळवारी चार विमानांना बॉम्बची धमकी देण्यात आली. त्यात दिल्लीहून शिकागोला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात बॉम्ब असल्याचे सांगण्यात आले. यानंतर विमान कॅनडाच्या दिशेने वळवण्यात आले. तेथे फ्लाइटची तपासणी करण्यात आली.
सोशल मीडिया प्लॅटफाॅर्म एक्सद्वारे एका पोस्टमध्ये, मुंबईहून निघणाऱ्या तीन आणि दिल्लीहून निघणाऱ्या एका विमानाला बॉम्बची धमकी देण्यात आली होती. धमकीची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या. एअर इंडियाची एक्स्प्रेस जयपूर-बंगलोर मार्गे अयोध्या फ्लाइटमध्ये (IX765) बॉम्बची धमकी दिली गेली. हे विमान अयोध्येत उतरवून तपास करण्यात आला. याशिवाय स्पाईसजेटच्या दरभंगा-मुंबई फ्लाइट (SG116) आणि अकासाच्या सिलीगुडी-बेंगलोर फ्लाइट (QP 1373) मध्येही बॉम्बची धमकी देण्यात आली होती. माहिती मिळेपर्यंत ही दोन्ही विमाने उतरली होती. दोन्ही विमानांची विमानतळावर सुरक्षा यंत्रणा आणि पोलिस दलांनी तपासणी केली.
याशिवाय दिल्लीहून शिकागोला जाणाऱ्या एअर इंडियाच्या एआय 127 या विमानातही बॉम्बची धमकी देण्यात आली होती. हे विमान शिकागोला रवाना झाले होते. माहिती मिळताच विमान कॅनडाच्या विमानतळाकडे वळवण्यात आले. येथे फ्लाइटची तपासणी केली. एअर इंडियाच्या म्हणण्यानुसार, विमान आणि प्रवाशांची सुरक्षा तपासणी पुन्हा केली जात आहे. विमानतळावर सुरक्षा यंत्रणांना सतर्क करण्यात आले आहे. अधिका-यांनी सांगितले की, विमानात बॉम्ब असल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान, सोमवारी मुंबईहून न्यूयॉर्कला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात बॉम्ब असल्याची धमकी देण्यात आली होती. त्या विमानाला दिल्लीकडे वळवण्यात आले. येथे सुरक्षा तपासणी दरम्यान काहीही संशयास्पद आढळले नाही. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अलीकडच्या काळात एअर इंडियासह अनेक स्थानिक विमान कंपन्यांना बॉम्बच्या धमक्या मिळाल्या आहेत. मात्र, सर्व धमक्या खोट्या असल्याचे निष्पन्न झाले. परंतु एक जबाबदार नागरी विमान वाहतूक सेवा प्रदाता असल्याने त्याची गांभीर्याने दखल घेतली जाते आणि आवश्यक ती पावले उचलली जातात. फेसबुकवर जारी करण्यात आलेल्या बॉम्बच्या धमकीच्या पोस्टचा तपास करण्यात पोलीस व्यस्त आहेत.





