खळबळजनक ! स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मुंबईत बॉम्बस्फोटाची धमकी; पोलिस हायअलर्टवर

मुंबई : देशभरात ७९ व्या स्वातंत्र्यदिनाची उत्साहात तयारी सुरू असताना, मुंबई शहरही सजावटीने आणि रोषणाईने नटले आहे. रेल्वे स्थानकांवर विशेष प्रकाशयोजना करण्यात आली असून, मुंबईकर हा सण साजरा करण्यास सज्ज झाले आहेत. मात्र, या उत्साही वातावरणात स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मुंबई पोलिसांना रेल्वेगाडीत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देणारा फोन आल्याने खळबळ उडाली आहे. अज्ञात व्यक्तीने हा धमकीचा कॉल करून लगेच संपर्क तोडल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे मुंबई पोलिसांनी हायअलर्ट जारी केला असून, सर्वत्र कडक सुरक्षा व्यवस्था लागू केली आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
मिळालेल्या माहितीनुसार, १५ ऑगस्टच्या एक दिवस आधी, म्हणजेच आज संध्याकाळी ६:३० वाजता, मुंबई पोलीस नियंत्रण कक्षात एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला. या कॉलदरम्यान त्या व्यक्तीने रेल्वेगाडीत मोठा बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी दिली आणि तात्काळ कॉल डिस्कनेक्ट केला. पोलिसांनी या नंबरवर पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो बंद असल्याचे आढळले.
या घटनेची माहिती त्वरित रेल्वे पोलिसांना देण्यात आली असून, सर्व रेल्वे स्थानकांवर सतर्कता वाढवण्यात आली आहे. आतापर्यंत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नसली, तरी पोलिसांकडून सघन तपास आणि गस्त सुरू आहे.या धमकीमुळे स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या असून, नागरिकांना कोणत्याही संशयास्पद गोष्टींची माहिती तात्काळ पोलिसांना कळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.





