अफगाणिस्तानच्या प्रभारी संरक्षण मंत्र्यावर बॉम्ब हल्ला; 10 जखमी

काबुल – अफगाणिस्तानच्या राजधानीच्या जवळच्या ग्रीन झोन या उच्चभ्रू वसाहतीमध्ये प्रभारी संरक्षण मंत्र्यांवर झालेल्या बॉबस्फोटात किमान 10 जण जखमी झाले. आरोग्य अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. या मोठ्या स्फोटाबरोबर काही कमी क्षमतेच्या स्फोटांचे आणि गोळीबारांचे आवाजही राजधानीच्या परिसरामध्ये ऐकू येत होते. मात्र जखमी झालेले लोक या अन्य स्फोटांमध्ये जखमी झाले की गोळीबारात हे निश्चितपणे समजू शकले नाही.
प्रभारी संरक्षण मंत्री बिस्मिल्ला खान मोहम्मदी यांच्यावर मंगळवारी रात्री बॉम्ब हल्ला झाला. मात्र या हल्ल्याची त्वरित कोणीही जबाबदारी घेतली नाही. मात्र तालिबान्यांनी देशातील सर्व प्रांतीय राजधान्यांवर जारदार हल्ले चढवायला सुरुवात केली असल्यामुळे या बॉम्बस्फोटामागे तालिबानचाच हात असल्याचे मानले जात आहे.
हा स्फोट अतिशय कडेकोट बंदोबस्त असलेल्या शेरपूर या आलिशान भागाच्या शेजारी झाला. याच भागाला ग्रीन झोन म्हणूनही संबोधले जाते. या भागामध्ये सरकारी वरिष्ठ अधिकाऱ्यांची घरे आहेत, असे गृहमंत्री मिरवेझ स्टॅनेकझाई यांनी सांगितले.
प्रभारी संरक्षण मंत्री बिस्मिल्ला खान मोहम्मदी हे ज्या गेस्टहाऊसमध्ये होते, तेथेच हा बॉम्बस्फोट झाला. मात्र यावेळी मोहम्मदी हे या गेस्टहाऊसमध्ये उपस्थित नव्हते आणि त्यांच्या कुटुंबीयांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे, असे त्यांच्या जमियत ए इस्लामी पक्षाने सांगितले. मोहम्मदी आणि त्यांचे कुटुंबीय सुरक्षित आहेत, असे पक्षाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
हा एक आत्मघातकी स्फोट होता आणि त्यामध्ये सुरक्षारक्षक जखमी झाले आहेत, असे संरक्षण मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या व्हिडीओ संदेशात मोहम्मदी यांनी सांगितले आहे. या स्फोटानंतर या परिसरातील शेकडो नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. या स्फोटाच्या तपासासाठी घरोघरी जाऊन तपासणी करायला सुरुवात केली आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.





