bollywood news | यावर्षी दिवाळीला एकाच वेळी दोन मोठे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. यात अजय देवगणच्या ‘सिंघम अगेन’ आणि ‘भूल भुलैया 3’चा समावेश आहे. यामुळे या दोन चित्रपटांपैकी प्रेक्षक कुठल्या चित्रपटाला दाद देतात यावरून सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
कार्तिक आर्यन आणि तृप्ती डिमरी या कलाकारांची भूमिका असलेला ‘भूल भुलैया 3’ हा चित्रपट यंदाच्या दिवाळीत चित्रपटगृहात दाखल होणार आहे. या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये आधीच उत्सुकता आहे. आता रोहित शेट्टीचा ‘सिंघम अगेन’ हा चित्रपटही याच दिवशी प्रदर्शित होणार आहे. या विषयावर बोलताना ‘भूल भुलैया 3’ चे दिग्दर्शक अनीस बज्मी म्हणतात, ‘आम्ही तीन वर्षांपूर्वी ‘भूल भुलैया 3′ ची रिलीज डेट जाहीर केली होती. पण बॉक्स ऑफिसवर एकाच वेळी दोन किंवा अधिक चित्रपट प्रदर्शित होत असतील, तर नुकसान होणार हे जवळपास निश्चित आहे.’ ‘भूल भुलैया 3’ ची रिलीज डेट मागे ढकलणार आहात. या प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले, ‘बघा, या विषयावर आम्ही अजून विचार केलेला नाही. अजय देवगण मित्र आहे आणि कधी कधी बॉक्स ऑफिस पुढे ढकलणे आपल्या सामर्थ्यात नसते’.
सिंघम अगेन हा चित्रपट स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार होता. मात्र, याच दिवशी पुष्पा 2: द रुल, वेदा आणि खेल बॉक्स ऑफिसवर रिलीज होत आहेत. त्यामुळे सिंघम अगेनची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली होती, अशात आता ‘भूल भुलैया 3’ मुळे पुन्हा एकदा रिलीज डेट बदलण्यात येणार का असा प्रश्न सध्या चर्चेत आहे.