Tiger Shroff : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण; दिल्ली पोलिसांकडून चौघांना अटक
हे आरोपी परदेशातून कारवाया करणाऱ्या अनिल पंडित नावाच्या गुंडाच्या सांगण्यावरून काम करत असल्याचा संशय पोलिसांना आहे.

Tiger Shroff – अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर झालेल्या गोळीबार प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने दोन महिलांसह चार जणांना अटक केली आहे. हे आरोपी परदेशातून कारवाया करणाऱ्या अनिल पंडित नावाच्या गुंडाच्या सांगण्यावरून काम करत असल्याचा संशय पोलिसांना आहे.
कुणाल (२१) आणि सुमित (१९, दोघेही रा. हरियाणा), राधा (२३) आणि बबिता (२३, दोघीही रा. उत्तर प्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने दिलेल्या माहितीनुसार, कुणाल नुकताच जामिनावर तुरुंगातून बाहेर आला होता. हरसाना गावातील एका मित्राने त्याची ओळख अनिल पंडितशी करून दिली. अनिल पंडित हा मूळचा पानिपतचा असून, तो सध्या अमेरिकेतून गुन्हेगारी कारवाया चालवतो.
तो लॉरेन्स बिश्नोई टोळीचा साथीदार असल्याचे मानले जाते. कुणालने त्यानंतर एका मेसेजिंग ॲपद्वारे पंडितशी संवाद साधण्यास सुरुवात केली, असे अधिकाऱ्याने सांगितले.
दरम्यान, या चौघा आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) त्यांना ताब्यात घेण्यासाठी आणि अधिकृतपणे अटक करण्यासाठी न्यायालयात अर्ज केला. न्यायालयाने हा अर्ज मंजूर करून मुंबई पोलिसांच्या पथकाला तीन दिवसांची ट्रान्झिट रिमांड दिली.





